पुणे: मनसे कार्यकर्त्यांनी वाघोली येथील खासगी शाळेची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी शाळेतील केबिनच्या काचा फोडल्या आणि खुर्च्या इकडे-तिकडे फेकल्याचा व्हिडीओ समोर आले आहे. तोडफोड करण्यात आलेल्या खासगी शाळेने कोरोना काळातील विद्यार्थ्यांच्या फी वसुलीसाठी १० वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा हॉल तिकीट देणे नाकारले होते.
शाळा प्रशासनाच्या या कारवाईवर पालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. ही बाब मनसे कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जेएसपीएम संस्थेच्या शाळेची तोडफोड केली. ‘ऐन परीक्षा काळात शाळेकडून अशा गोष्टी करण्यात आल्याने पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे’, असे म्हणत मनसेकडून तोडफोड करण्यात आली आहे.
23 फेब्रुवारीला अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा
विद्यार्थ्यांच्या समस्या सोडण्यासाठी अमित्र ठाकरे मैदानात उतरणार आहेत. पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 23 फेब्रुवारीला मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.