दीपक खिलारे / इंदापूर : इंदापूर येथील पत्रकार सुरेश मिसाळ यांचे वयाच्या ४० व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सुरेश मिसाळ हे मागील २५ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी वार्ताहर म्हणून काम केले आहे. इंदापूर तालुक्याच्या विविध समस्या त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडल्या आहेत. मिसाळ यांची निर्भीड पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख होती.
सुरेश मिसाळ यांना काल (दि. ८) दुपारी ३ वाजता त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने अकलूज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज (दि.९) सकाळी साडे नऊ वाजता त्यांच्यावर इंदापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, युवानेते प्रवीण माने तसेच पत्रकार व हजारो नागरिक उपस्थित होते. पत्रकार सुरेश मिसाळ यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, तीन भाऊ, वहिनी व बहीण असा परिवार आहे.