नवी दिल्ली : भारतीय टपाल खाते अर्थात पोस्ट खात्यात नोकरी मिळावी, अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी अनेकजण प्रयत्नही करतात. जेव्हा ही भरती होते तेव्हा हजारो पदे भरली जातात. त्यापैकी एक म्हणजे ग्रामीण डाक सेवक त्याला GDS ही म्हणतात. यामध्ये अनेकांना नोकरीही मिळते. पण काहींना या पदासाठी नेमकी कागदपत्रे काय लागतात, वयोमर्यादा काय असते याची माहिती नसते. त्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत…
सध्याच्या भरती प्रक्रियेत किती पदे भरली जाणार?
ग्रामीण डाक सेवक (GDS) आणि शाखा पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)या पदांसाठी भरती होत आहे. याद्वारे 30041 पदांची भरती केली जाणार आहे.
काय असते शैक्षणिक पात्रता?
उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाते.
वयोमर्यादा किती?
उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावी. कमाल वयोमर्यादा SC उमेदवारांसाठी पाच वर्षे, OBC उमेदवारांसाठी तीन वर्षे आणि PWD उमेदवारांसाठी दहा वर्षे असेल. रिक्त पदांच्या अधिसूचनेच्या तारखेनुसार GDS पदांवर नियुक्तीसाठी किमान आणि कमाल वय अनुक्रमे 18 आणि 40 वर्षे असावे.
इतर अर्हता काय?
जीडीएस पदासाठी नोकरीसाठी उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराने दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच केंद्र किंवा राज्य सरकारे, विद्यापीठे, मंडळे किंवा खाजगी संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही संगणक प्रशिक्षण संस्थेतून किमान 60 दिवसांच्या मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.