Job News : मुंबई : सरकारी नोकरी मिळावी, अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी प्रयत्नही असतो. पण आता सरकारी नोकरी मिळण्याची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांवर भरती केली जाणार आहे. याअंतर्गत बारावी आणि पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
एमपीएससीअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या एकूण 615 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारितील सध्या कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई म्हणून निवड केली जाईल. एमपीएससीच्या या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 38 हजार ते 1 लाख 22 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.
अर्ज प्रक्रियेला सुरुवात?
उमेदवारांना 11 सप्टेंबर 2023 पासून अर्ज करता येणार आहे. तर 3 ऑक्टोबर 2023 ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे.
काय असावी पात्रता?
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीसह 4 वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेली असावी. बारावी उत्तीर्णसह 5 वर्षे नियमित सेवा किंवा दहावी उत्तीर्णसह 6 वर्षे नियमित सेवा केलेली असावी.
वयोमर्यादा काय?
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 3 ऑक्टोबर 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. मागासवर्गीय उमेदवारांना यातून 5 वर्षांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे.
अर्ज शुल्क किती?
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 544 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे. तर मागासवर्गीय / आ. दु. घ. / अनाथ उमेदवारांकडून 344 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल.