पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, केवळ इर्षा व स्वार्थापोटी अजित पवार हे पंचक्वानाच्या ताटावरून पत्रावळीवर जाऊन बसले आहेत, आता मला कोणी वाढतंय का? अशी वाट त्यांना पहावी लागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा अजित दादांचे हे उदाहरण कायम लिहिले जाईल अशी टीका शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.
पुढे बोलताना म्हणाले, सुप्रिया सुळे या अजित पवार यांना कायम दादा, दादा करायच्या तेव्हा, मला राग यायचा. कारण दादांना सुळे यांचे प्रेम, घर तुटू नये, पक्ष तुटू नये अशी त्यांची भावना कधी समजली नाही. प्रेम व हृदय यांचा दादांशी कधी संबंधच आला नाही.
अर्चना पाटील यांच्या वक्तव्याबाबत आव्हाड म्हणाले कि, अर्चना पाटील सत्य बोलल्या. आम्ही ही तेच सांगत आहोत. रायगड व बारामती या दोन जागा सोडल्या, तर अजित पवार यांनी पक्ष फोडून मिळवले तरी काय? ३५ वर्ष राजकारणात मेहनत घेणारे आज पक्षात धडपड करत आहेत. स्व:ताच्या स्वार्थासाठी अजित पवार यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे वाटोळे करण्याचे काम केले, असा हल्लबोल आव्हाड यांनी केला.