पिंपरी (पुणे): सराफाने ४४ ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून एक टक्के व्याजदराने सोने गहाण ठेवून घेतले. त्यानंतर ग्राहकांना त्यांचे सोने परत न करता दुकान बंद करून एकूण दीड कोटीची फसवणूक केली. या प्रकरणी मंगळवारी (दि.१५) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेश आनंदा हाके, दिनेश आनंदा हाके (रा. चिंचवड; मूळ रा. सांगली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष महादेव थोरात (वय ४१) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २० ऑक्टोबर २०२३ ते २५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत सिद्धिविनायक ज्वेलर्स, साने चौक, चिखली येथे घडला.
सिद्धिविनायक ज्वेलर्स या दुकानाचे मालक आरोपी गणेश आणि दिनेश यांनी आपसात संगनमत करून फिर्यादी आणि त्यांच्याप्रमाणेच एकूण ४४ नागरिकांना सोने गहाण ठेवीवर बँकेपेक्षा कमी व्याजदराने म्हणजेच एक टक्के व्याजदराने सोने गहाण ठेवून पैसे देण्याचे असे आमिष दाखवले. त्यातून ४४ जणांचे एक कोटी ५२ लाख ६० हजार रुपये किमतीचे २१८ तोळे सोने गहाण ठेवून घेतले.
सोने गहाण ठेवल्याबाबत ग्राहकांना कार्ड दिले. त्यानंतर दुकान बंद करून आरोपी पळून गेले. काही ग्राहकांनी गहाण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची मुद्दल परत दिली. तरीदेखील त्यांना त्यांचे दागिने परत न देता फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.