पुणे : पुण्यातील एका ज्वेलरी दुकानातून तीन कोटी रुपयांचे साेन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शहरातील रविवार पेठ परिसरात ३१ डिसेंबरच्या रात्री घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी ज्वेलर्स दुकानाच्या मालकाने फरासखान पोलिस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, 31 डिसेंबरच्या मध्यरात्री रविवार पेठेत सोन्याच्या दुकानात चोरी झाली. यामध्ये चोरट्यांने 3 कोटी रुपयांचे दागिने चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजचे पुनरावलोकन केल्यावर पोलिसांनी पूर्वीच्या कर्मचाऱ्यावर संशय घेतला आहे. सीसीटीव्हीत दिसल्याप्रमाणे कोणीही जबरस्तीने प्रवेश केला नाही असं दिसून येत आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा चुड्पा यांनी सांगितले की, चोरी झालेल्या वस्तूंमध्ये ₹3.03 कोटी किमतीचे सोन्याचे दागिने, 5.3 किलो वजनाचे आणि रोख ₹10 लाख 93 हजारांचा समावेश आहे. अज्ञात व्यक्तीने प्रवेश करण्यासाठी डुप्लिकेट चावी बनवल्याचे दिसत आहे. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आमचा तपास सुरु आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.