-विजय लोखंडे
वाघोली : वाघोलीच्या माजी आदर्श सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांना शंभू राज्याभिषेक ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय जिजाऊ गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यामुळे वाघोली उपनगराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एतिहासिक आग्रा सुटकेला 358 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने शिवसन्मान सोहळ्याचे आयोजन पुणे येथील लाल महालात करण्यात आले होते. यामध्ये आजवर केलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शंभू राज्याभिषेक ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शेखर पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते.
वाघोलीच्या सरपंच असताना जयश्री राजेंद्र सातव पाटील यांनी अनेक सार्वजनिक व लोकहिताची विकासकामे मार्गी लावत गावचा सर्वांगीण विकास साधण्याचे काम केले आहे. तसेच आजवर कोणत्याही पदावर नसताना समाजसेवेच्या माध्यमातून अनेक क्षेत्रात लोकउपयोगी कामे केली आहेत. तर जयश्री राजेंद्र सातव पाटील यांचे कुटुंबाची ओळख एक दानशूर कुटुंब म्हणून जिल्ह्यात आहे.
सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आदी क्षेत्रात जयश्री सातव पाटील यांची भरघोस मदत केली असून सर्वोत्तम कार्य समाजात चालू आहे. त्यांना अनेक क्षेत्रात समाजसेवेचे आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असल्याने त्यांच्या या आदर्श कार्याची दखल शंभू राज्याभिषेक ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांनी घेऊनच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांना राज्यस्तरीय जिजाऊ गौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे. याबाबत सर्व स्तरावर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अतुल शिंदे यांनी दिली.