यवत: महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने रब्बी हंगाम सन २०२३-२४ राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत यवत येथील भुलेश्वर पायथा येथे ज्वारी प्रकल्पाचा शेती दिन शेतकरी मल्हारी तात्याबा दोरगे, लहू देवराम दोरगे यांच्या शेतात आयोजित करण्यात आला होता.
राज्यात ज्वारीची बर्यापैकी शेती नजरेस पडते. राज्यातील अनेक शेतकरी बांधव रब्बी हंगामात ज्वारी पेरणी करत असतात. ज्वारीची लागवड विशेषत: जनावरांसाठी वैरण तसेच मानवासाठी धान्य या दुहेरी उद्देशाने केली जाते. ज्वारीचा चारा जनावरांसाठी विशेष उपयोगी असल्याने राज्यातील अनेक पशुपालक शेतकरी याची मोठ्या प्रमाणात शेती करताना बघायला मिळतात. ज्वारीची लागवड ज्या ज्या विभागात केली जात आहे, तेथील मजूर वर्गाचे तसेच गरीब लोकांचे ते एक प्रमुख अन्नधान्य असते. अलीकडे ज्वारीची मागणी शहरी भागात देखील वाढत आहे.
ज्वारी प्रकल्पामध्ये यवत गावाची निवड करून शेतकऱ्यांना पिकाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करून निविष्ठांचे वाटप करण्यात आले होते. मंडळ कृषी अधिकारी स्वप्नील बनकर व कृषी पर्यवेक्षक मनोज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना पेरणीपासून ते काढणीपर्यंत पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याविषयी कृषी सहाय्यक अधिकारी विनायक जगताप यांच्या नियोजनात पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.
ज्वारी उत्पादक कुलदीप दोरगे यांनी ज्वारीचे पीक खुप चांगले असून, नेहमीच्या पद्धतीपेक्षा नवीन पद्धतीने ३० ते ४० टक्के उत्पादनामध्ये वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला. यावेळी कृषी पर्यवेक्षक मनोज मिसाळ, कृषी सहाय्यक विनायक जगताप, श्रीनाथ शेतकरी गटाचे अध्यक्ष तात्याबा दोरगे, प्रयोगशील शेतकरी गणेश कोळपे, माजी चेअरमन राजेंद्र दोरगे, माजी ग्राम पंचायत सदस्य प्रगतशील शेतकरी भगवान दोरगे, काशिनाथ दोरगे, लहू दोरगे, दिगंबर दोरगे, सिद्धार्थ भालेराव, दौलत दोरगे, आशाबाई दोरगे, सुवर्णा भालेराव, चिमाजी चोरमले, संदीप भालेराव, तुषार दोरगे , रिसोर्स फार्मर युवराज जगताप यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी विभागाने राबवलेल्या प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त करत कृषी विभागाचे आभार मानले.