पुणे : पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार शुभम प्रमोद शिंदे (वय- 26 रा. मध्यवर्ती मंडळाजवळ, जनता वसाहत, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्याखाली स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.
शुभम शिंदे हा पर्वती पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने विश्रामबाग व पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवली असून आरोपीने त्याच्या साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चाकू, कोयता यासारख्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्यावर 2 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास समोर येत नव्हते.
आरोपी शुभम शिंदे याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना पाठवला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी शुभम शिंदे याला एमपीडीए कायद्याखाली नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
ही कमगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखा पीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.