लोणी काळभोर : साधना सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी जानकु तुळजाराम कदम यांची तर उपाध्यक्षपदी प्रताप शंकर बोरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मावळते अध्यक्ष सुभाष नर्सिंग काळभोर व उपाध्यक्ष बाळासाहेब तुपे यांनी आपल्या पदाचा कार्यकाल संपल्यानंतर राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सहाय्यक निबंधक वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.15) पार पडली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये अध्यक्षपदासाठी जानकु कदम व उपाध्यक्ष पदासाठी प्रताप बोरकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक वाबळे यांनी कदम यांची अध्यक्षपदी, तर बोरकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
दरम्यान, साधना सहकारी बँक ही गेली 47 वर्षे पुण्याच्या पूर्व भागात आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली बँक आहे. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असून महाराष्ट्रामध्ये 28 शाखा व एक विस्तारीत कक्ष व एक मुख्य कार्यालय असा बँकेचा विस्तार आहे.
बँकेला सतत ऑडीट वर्ग “अ” असून गेली 18 वर्षे शून्य टक्के एन पी ए ठेवला आहे. सभासदांना दरवर्षी दहा टक्के लाभांश दिला जात आहे, सभासदांसाठी मोफत आरोग्य तपासणी, कुटुंबनियोजन अनुदान सभासदांच्या पाल्याकरिता शैक्षणिक अनुदान, दुर्धर आजारासाठी आर्थिक अनुदान अशा स्वरूपाच्या सेवा सुरू केल्या आहेत. तसेच या पुढील काळात बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे. असे नवनिर्वाचित अध्यक्ष जानकु कदम यावेळी म्हणाले.