शुभम वाकचौरे
Jambut News: जांबूत : ‘चांद्रयान- ३’च्या यशानंतर ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना खगोलविज्ञानाची गोडी निर्माण झाली आहे. ‘इस्रो’मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांनी प्रथम आपल्या मनातील न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. येथे काम करणारे बहुतांश कर्मचारी ग्रामीण भागातील आहेत. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ‘इस्रो’च्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर थेट कामाची संधी मिळते. स्पर्धा परीक्षांमार्फत देखील विद्यार्थ्यांना ‘इस्रो’मध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. यशस्वी होण्यासाठी आई-वडिलांप्रती आदर ठेवा, भरपूर अभ्यास करा, मेहनत करा, जिद्द ठेवा आणि आपले ध्येय गाठा, असे आवाहन ‘इस्रो’ या जगप्रसिद्ध संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असणारे मयुरेश शेटे यांनी केले.
समर्थ शैक्षणिक संकुल येथे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन
बेल्हे येथील समर्थ रोड एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल येथे नुकतेच चांद्रयान- ३ या मोहिमेविषयी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. (Jambut News) या वेळी शेटे बोलत होते. शास्त्रज्ञ शेटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी कुतूहलाने विचारलेल्या चांद्रयान-३ मोहिमेसंदर्भातील अनेकविध प्रश्नांना त्यांनी चपखल उत्तरे देऊन, विद्यार्थ्यांचे शंकासमाधान केले.
चांद्रयान मोहिमेविषयी अनुभव कथन करताना शेटे म्हणाले की, ती शेवटची १० ते १५ मिनिटे सर्वांसाठीच फार औत्स्युक्याची होती. तणावपूर्ण वातावरण होते. रोवर जेव्हा चंद्रावर लँड झाले त्यावेळी सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. इस्रो आणि सर्व भारतवासीयांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता. हा विजय मनस्वी आनंद मिळवून देणारा होता.
समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने या वेळी मयुरेश शेटे व त्यांचे वडील माजी प्राचार्य कैलास शेटे या दोघांचाही शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. (Jambut News) या वेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, सर्व विभागांचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियांत्रिकीचे प्राचार्य प्रा. डॉ. धनंजय उपासनी यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा. निर्मल कोठारी यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात दहीहंडी पहायला जाताय? शहरातील वाहतूकीत झालेले बदल नक्की जाणून घ्या!