-संतोष पवार
पळसदेव (पुणे) : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या आणि धरणग्रस्तांच्या आयुष्याला नवसंजीवनी प्राप्त करून देणाऱ्या उजनीच्या पाण्याचे जलपूजन, हा सर्वाधिक आनंदाचा क्षण असल्याचे प्रतिपादन माजी सहकार व संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
पळसदेव (ता. इंदापूर) येथे उजनीधरण 100 टक्के भरल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उजनीच्या पाण्याचे जलपूजन केले. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलते कै. भाऊंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कर्तव्य व त्यागसमर्पण भावनेतून हत्तीच्या मस्तकासारख्या असणाऱ्या आपल्या जमिनी अत्यंत अल्प मोबदल्यात देऊन उजनी धरणासाठी मोठा त्याग केलेला आहे. उजनी धरणामुळे या भागात सहकारी साखर कारखानदारी व्यवसायाला मोठे पाठबळ मिळाले. शेती, उद्योगधंदे पिण्यासाठी पाणीपुरवठा व औद्यिगिकीकरण यासाठी मोठा हातभार लागत आहे. गेल्यावर्षी मायनसमध्ये गेलेल्या धरणात सात दिवसात 115 टीएमसी पाणी आल्याने ते शंभर टक्के भरले आहे, याचा शेतकऱ्यांना मोठा आनंद झाला आहे.
वर्षातील 365 दिवस पुरेल असे पाणी वितरणाचे नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र पाणी वितरणाच्या गलथान नियोजनाचा मोठा फटका तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना बसत आहे. उजनी प्रकल्प सिंचन आराखड्यानुसार प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचे पाणी राखीव ठेवण्याची गरज असुन पुढील पावसाळ्यापर्यंत सर्वांना पाणी पुरेल असे नियोजन करण्याची विनंती पुणे व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांना आहे, असे प्रतिपादन पाटील यांनी केले. पाणी वितरणाचे सुयोग्य नियोजन आणि धरणाच्या प्रदुषणाच्या मुद्द्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन भविष्यात प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
उजनीच्या पाण्याच्या जलपुजनावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक भूषण काळे, पळसदेवचे सरपंच अंकुश जाधव, हिराचंद काळे, शरद काळे, संतोष काळे, महेंद्र काळे, स्वप्नील काळे विकास शिंदे, अनिल काळे, हरीश काळेल, आजिनाथ पवार, अमर काळे, प्रवीण काळे आदींसह नागरिक उपस्थित होते.