गणेश सुळ
केडगाव : दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या दोन महिन्यांपासून विविध केबल लाईन, जलजीवन मिशन अशी विविध विकासकामे सुरू आहेत. नाथाचीवाडी येथील माटोबा तलाव या ठीकाणावरून तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी नेण्यासाठी पाईपलाईनचे काम सुरू आहे. हे काम चालू असताना सर्वसामान्य जनतेचा विचार न करता दिवस-रात्र रस्त्याचे डांबर, काँक्रीटीकरण, साईट पट्टी फोडण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवलेला आहे. या रखडलेल्या कामाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
या कामांसाठी वेगवेगळे ठेकेदार असल्यामुळे कामांमध्ये दिरंगाई होत आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या समन्वयाच्या अभावामुळे रस्ते खोदून बरेच दिवस तसेच ठेवलेले आहेत. परिणामी या भागातून जाताना वाहनचालक, पादचारी व सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा फटका स्थानिक रहिवाशी, व्यापारी, रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. प्रशासनाने या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
प्रशासनाने विकासकामे करत असताना पर्यायी रस्ता व नागरिकांच्या हिताच्या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या शाळांच्या परीक्षांचे दिवस आहेत. सायंकाळी वाहतुकीची मोठी कोंडी होते. प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, असे मत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केले.
रखडलेल्या कामांचा फटका आम्हा व्यावसायिक व सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर बसत आहे. रस्ता खोदून ठेवल्याने वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागतात. या खोदलेल्या रस्त्यामुळे ग्राहक वस्तू खरेदीसाठी थांबत नाही. दगड-गोटे वर आल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. डांबरीकरण फोडून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. लवकरात लवकर यासाठी उपाययोजना आखून सहकार्य करावे.
– श्रीनाथ दोरगे, हॉटेल व्यावसायिक, खुटबाव