पुणे : अजितदादांनी पहाटेच्या शपथविधीचा निर्णय मनाने घेतला असता तर त्यांना महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री करण्यात आलं असतं का? साहेब कसे नेते आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे, अशी टीका जय पवार यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी शरद पवार यांना सवाल केला आहे. ते आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारादरम्यान बोलत होते.
यावेळी जय पवार म्हणाले, अजितदादांनी अनेक वर्ष साहेबांच सगळंच ऐकलं. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या आधी दादांनी फडणवीसांसोबत शपथविधी केला आणि त्याच दिवशी दुपारी सर्वजण दादांच्या विरोधात गेले. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, जर हा निर्णय दादांचा स्वतःचा निर्णय होता, तर साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये दादांना उपमुख्यमंत्री केलं असतं का? आपल्याला सर्वांना माहिती आहे की, साहेब कसे नेते आहेत, असं असतं तर दादांना त्यांनी संधीचं दिली नसती. पण हे खरं कोणी तुम्हाला सांगत नाही, असं वक्तव्य जय पवार यांनी केलं आहे.
पुढे म्हणाले, आज ही निवडणूक त्यांनी भावनिक पद्धतीने चालू केलेली आहे. कारण पंधरा वर्षे सुप्रियाताई खासदार होत्या. मला काल पुरंदरमधलेही लोक बोलले, जर हे दोन गट झाले नसते तर त्यांच्याकडे बोलायला मुद्देच नव्हते. आता हे दोन गट झाले आहेत, म्हणून त्यांना भावनिक बोलावं लागत आहे. साहेबांच्या बाजूनेच का आपण भावनिक व्हायचं, दादांच्या बाजूने का नाही?, असा सवाल जय पवार यांनी केला.
अजितदादांवरती ईडीच्या कारवाई चालू होत्या. तेव्हा दादांबरोबरच साहेबांवरही टीका होत होती. त्यावेळेस दादा भुजबळांसोबत एकटे ईडीच्या कार्यालयात गेले. त्यावेळेस कुठे होते कुटुंब? पण जेव्हा रोहित पवारांवर ईडीची कारवाई झाली तेव्हा त्या ठिकाणी साहेब स्वतः गेले. सुप्रियाताई गेल्या, प्रतिभा आजी स्वतः गेल्या, असा आरोपही जय पवार यांनी केला.