पुणे : अपंगत्व असले म्हणून काय झाले? हिंमत नाही हारायची. गरीब कुटूंबात जन्माला आली असली तरी शिक्षण घेण्याकडे तिचा कल होता. प्रसंगी पाच किलोमिटर अंतर पायी चालत जाऊन शिक्षणाची मुलभूत गरज आत्मसाथ केली. सकारात्मक इच्छाशक्तिच्या जोरावर भारतीय डाक विभागात नोकरी मिळवली. शासकिय योजनांचा संदेश घरोघरी पोहचविले. महिलांमध्ये बचतीची सवय लावून सर्वसामान्य नागरिकांच्या ह्दयात स्थान मिळवणाऱ्या बारामती तालुक्यातील माळेगाव बुंद्रुक येथील रणरागिनी पोस्ट मास्तर व्दारका राऊतविषयी घेतलेला हा वेध…
बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील शेतमजूर असणारे रामचंद्र राऊत यांच्या कुटूंबात द्वारका यांचा जन्म झाला. आई वडील व एक भाऊ व तीन बहिनी असा त्यांचा परीवार होता. मात्र व्दारका यांना जन्मतः अपंगत्व असल्याने कुटूंबात नेहमी नाराजीचा सुर असायचा. शेतमजूरी करत असताना प्रपंच चालवणे जिकीरीचे होते. आई सोबत या चारही मुलींनी शेतमजूरी करत प्रपंचाला आधार दिला आहे. त्यात व्दारका यांचं अपंगत्व नेहमी कमीपणा जाणवणारा होता. पाठित कुबड व कमी उंची यामुळे आलेलं अपंगत्व तिच्या समोर अनेक समस्या उभ्या करणार होतं.
माळेगाव बुद्रुक येथे जिल्हा परिषद प्राथमिक वस्ती शाळेत त्यांचे चौथीपर्यंत शिक्षण झाले. शिवनगर येथील शारदाबाई पवार विद्यालयात त्यांचे पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण झाले. घरची गरिबी परिस्थीती यामुळे पुढे तिला शिक्षण सोडून देण्याची वेळ आली. शाळेत जाण्यासाठी पाच किलोमीटर त्यांना चालत जावे लागे. दहावीच्या पुढे तिला शिक्षण घेता आले नाही.
भाऊ दादासाहेब राउत याने शेतमजूरी करूनच जिद्द व चिकाटीने आयुष्याला वळण दिले आहे. पुणे येथे भारतीय डाक विभागात तो कामाला जाऊ लागला त्यानंतर या कुटूंबाला प्रगतीचा खरा मार्ग दिसला. द्वारका या त्यांच्याकडे राहण्यासाठी असल्याने तिला पोस्टातील विविध योजनांची माहिती मिळत होती. तेव्हा कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील टपाल कार्यालयात ब्रांच पोस्टमास्टरची जागा निघाली होती. द्वारका यांनी भावाच्या मदतीने भरतीचा अर्ज भरला. इथून खरा द्वारका यांचा भारतीय पोस्टाशी प्रवास सुरू झाला. 4 मे १९९३ मध्ये पोस्टात कामाला रुजू झाल्या. तेव्हा त्यांनी पहिला पगार 435 रुपये घेतला. खेडेगावातून आल्यामुळे हे काम करणे त्यांना खूपच अवघड होते.
पोस्टातील सहकाऱ्यांनी समजावून सांगून खूप मोठी मदत केली. पहिल्यांदा त्यांच्या जवळ ७ महिलांची बचत खाती सुरू झाली. या काळात या वस्तीची लोकसंख्या ४ हजार होती. आता येथील लोकसंख्या १० हजारावर गेली असून १४०० महिलांची बचत खाती त्यांच्य़ाजवळ आहे. त्यातून महिलांना आर्थीक विकास साधता आला. येथील पोस्ट ऑफिसमध्ये डाक जीवन विमा, महिला सन्मान, सुकन्या समृद्धी व विविध प्रकारच्या योजना द्वारका राऊत यांनी चांगल्या प्रकारे राबविल्या आहेत. याचबरोबर नागरिकांचे नवीन खाते उघडण्यास देखील त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. या पोस्टात नागरिकांना नेहमी चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे कदमवाकवस्ती व परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. नुकत्याच सुरू झालेल्या लाडकी बहिन योजनेतून ५०० खाती सुरू करण्यात आले.
२००६ ला वडील तर २०२१ मध्ये आई काळाच्या पडद्याआड गेले. शेतमजूरी करताना काम कोणतेच कमी नसते अशी दिलेली शिकवण यामुळे समाजात चांगले काम करत आहे. आजच्या स्थितीला पोस्ट खात्याच्या कामामुळे अपंगत्व असूनही उभे राहण्याचे बळ मिळाले. हे पहाण्यासाठी आई वडील हवे होते. हे सांगताना व्दारका यांचे डोळे भरून येतात.