पुणे : पुण्यातल्या मुळशी भागात एका प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलमध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. भूक भागवण्यासाठी मुळशीतलं प्रसिद्ध बिर्याणी हॉटेल फोडत हॉटेलच्या किचनमध्ये तिघे जण तोंडाला मास्क लावून घुसल्याची घटना समोर आली आहे. संपूर्ण किचन उचकले पण त्यांना एकाही भांड्यामध्ये बिर्याणीचा एक घास देखील मिळाला नाही. शेवटी बिर्याणी न मिळाल्याने चोरट्यांनी हॉटेलमधलं चिकन लॉलीपॉप आणि 30 रुपयांची चिल्लर चोरली व कोल्ड्रींक पिऊन तिथून पळ काढला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील मुळशी भागात एका प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलमध्ये 14 जानेवारी रोजी पहाटे 3.51 वाजता हा चोरीचा सर्व प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
सीसीटीव्हीमध्ये नेमकं काय?
सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या फुटेजनुसार, दोन ते तीन चोरट्यांनी हॉटेलचे शटर तोडण्यात आले. नंतर आत प्रवेश केला. हॉटेलमध्ये बिर्याणी प्रसिद्ध असल्याने चोरटे थेट किचनमध्ये घुसले. त्यांच्या तोंडाला मास्क लावण्यात आले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण आहे. चोरट्यांनी किचनमधील प्रत्येक भांडे उचकले, पण त्यांना बिर्याणीचा एक घासही सापडून आला नाही.
बिर्याणी न मिळाल्याने संतापलेल्या चोरट्यांनी हॉटेलमधील चिकन लॉलीपॉप चोरले आणि 30 रुपयांची चिल्लरही लुटण्यात आली. तिथल्या कोल्ड्रिंक्स पिऊन त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे किचनमध्ये गोंधळ घालताना आणि भांडे तपासत असताना स्पष्टपणे दिसून येत आहेत.
हॉटेल मालकांनी या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. या घटनेने हॉटेल मालकांना आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच बिर्याणीच्या शोधात आलेल्या चोरट्यांच्या या कृत्यामुळे ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. मुळशी भागातील हे हॉटेल बिर्याणीसाठी प्रसिद्ध असून अनेक ग्राहक येथे येत असतात. या घटनेनंतर हॉटेलमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.