पुणे : पुण्यात चोरीच्या घटनामध्ये वाढ होतना दिसत आहे. कल्याणीनगर येथील कल्याणी हॉटेलबाहेर पार्क केलेल्या कारची खिडकी तोडून एका व्यक्तीने 2 लाख 52 हजार रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरल्याची घटना घडली आहे. यामध्ये लॅपटॉप, सोनसाखळी, स्मार्ट फोन असलेली बॅग चोरट्यांनी पळवली आहे. ही घटना शनिवारी (दि. १०) सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर चौक येथील कल्याणी हॉटेलसमोर घडली आहे.
याप्रकरणी ऋषिकेश अजित सोमवंशी (वय-३४, व्यवसाय नोकरी, रा. मयुरे-वार अपा. प्लॅट नं. १७, रासनेनगर चौक, सावेडी, अहमदनगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयिताची ओळख पटवण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश सोमवंशी हे अहमदनगर येथील एका खाजगी बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी तो आपल्या मित्रासह नातेवाईकांना भेटण्यासाठी पुण्यात आला होता. परत जात असताना ते कल्याणी हॉटेलसमोर कार उभी करून जेवण करण्यासाठी गेले. त्यानंतर हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याने त्यांच्या गाडीच्या खिडकीची काच तुटल्याची माहिती दिली.
फिर्यादी सोमवंशी यांनी त्यांच्या मित्रासह घटनास्थळी धाव घेतली असता त्यांच्या कारच्या खिडकीची काच तुटलेले दिसली. त्यांनी कारमध्ये पाहिले असता लॅपटॉप, मोबाईल व सोनसाखळीसह मौल्यवान वस्तूंची बॅग असे मिळून तब्बल अडीच लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेले. याप्रकरणी सोमवंशी यांनी येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.