पुणे : शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात. मात्र, हेच आदर्श चोर निघाले तर? अशाच एका शिक्षकाने चक्क रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरले. या शिक्षकाला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान पाठलाग करुन अटक केली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बाळू प्रकाश रणपिसे (वय-३२, रा. मु. पो. बोरगाव, डॉ. आंबेडकर नगर, बौद्ध विहार जवळ, ता. माळशिरस जि. सोलापूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसका मारुन चोरून नेताना आरोपीला अटक केली. ही कारवाई सोमवारी (ता. १८) दुपारी दीडच्या सुमारास स्वारगेट परिसरात केली. याबाबत मंजुळा नारायण चिल्लाळ (वय ५९, रा. गुजरवाडी, कात्रज, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट एसटी स्टँड, पीएमटी बस स्टॉप या गर्दीच्या ठिकाण गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास पेट्रोलींग करत होते. दरम्यान, फिर्य़ादी महिला या स्वारगेट पोलीस ठाण्यासमोरुन घोरपडे पेठच्या दिशेने पायी चालत जात होत्या. त्यावेळी आरोपीने पाठीमागून चालत येत असलेल्या महिलेच्या गळ्यातील ६६ हजार रुपये किमतीचे ११ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळून जाऊ लागला. त्यावेळी पेट्रोलींग करत असलेले पोलीस अंमलदार मोहसीन शेख व संजय जाधव यांनी आरोपीचा पाठलाग करुन त्याला पकडले. चौकशीत तो शिक्षक असल्याचे समोर आले. पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्या ट्रॅक पॅंटच्या खिशात तुटलेले मंगळसूत्र आढळले.
दरम्यान, सापडलेल्या मंगळसूत्राची शहानिशा केल्यानंतर हे मंगळसूत्र फिर्यादींनी ओळखून त्यांचेच असल्याचे स्पष्ट केले. पंचनामा करुन मंगळसूत्र जप्त करण्यात आले. आरोपीला खडक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.