पुणे : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर १६ एप्रिल रोजी गोळीबाराची घटना घडली होती. या गोळीबार प्रकरणाचा पुणे पोलिसांनी उलगडा केला आहे. संपत्तीच्या वादातून वडिलांनीच पोटच्या पोराच्या हत्येची पन्नास लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी वडिलांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज दिनेशचंद्र आरगडे या बांधकाम व्यवसायिकावर दोन गुंडांनी गोळीबाराचा प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता. वडिलांनीच मुलाला मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी दिली होती. त्यातले २५ लाख रुपये दिले होते आणि २५ लाख देणे शिल्लक होते. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाईट्स जवळ दुपारच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेने परिसारत मोठी खळबळ उडाली होती.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धीरज अरगडे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर वडिलांनीच मुलावर गोळीबाराचा कट रचून मुलाच्या हत्येचा कट रचला. मात्र तो फसल्याने वडिलांंचं पितळ उघडं पडलं.
नेमकं प्रकरण काय?
धीरज आरगडे हे त्यांच्या आरगडे हाऊस या ऑफिसच्या खाली येऊन रोडवर पार्क केलेल्या गाडीत बसले होते. त्यावेळी दुचाकीवरुन हेल्मेट घातलेले दोघे जण त्याठिकाणी आले. त्यांनी अंगावर स्वीगीच्या लाल टीशर्ट सारखा टी शर्ट घातला होता. हल्लेखोर त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी त्यांच्यावर दोनदा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐनवेळी पिस्तूल लॉक झाली आणि त्यामुळे त्यांचा डाव फसला. आरगडे यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपी पळून गेले. या संपूर्ण घटनेचा तपास पुणे पोलिसांनी केला असता वडिलांनीच संपत्तीच्या वादातून मुलाच्या हत्येचा प्लॅन केला असल्याचे निष्पन्न झाले.