पुणे : पुण्यातील गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही. दागिण्याबाबत मुलाला विचारपूस केल्यामुळे मुलाने आईवर थेट चाकूने हल्ला केला आहे. ही घटना थेरगाव येथे घडली आहे. याप्रकरणी आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मुलगा ओंकार ईश्वर बामणे (वय १९ रा. थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि त्यांची दोन मुले एकत्र राहतात. ओंकार हा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आईने आपल्या मुलाला घरातील दागिने कुठे ठेवले आहेत. का गहाण ठेवले की विकले असं आईने विचारले. त्यानंतर यासंदर्भात माहिती दे नाहीतर पोलिसांना बोलवेल, अशी आईने मुलाला धमकी दिली असता मुलाने थेट चाकूने आईवरच जीवघेणा हल्ला केला आहे. रागाच्याभरात ओंकारने ‘तू जिवंत राहिलीस तर पोलिसांना बोलावशील’ असं म्हणत घरातील चाकूने जन्मदात्या आईच्या डोक्यावर आणि हातावर वार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.