पुणे : Pune Crime – भावाने बहिणीची फसवणूक करत तिच्या बॅंक खात्यातून परस्पर ४ लाख १९ हजार रुपये काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime) तसेच बहिणीने घरातील व्यक्तीच्या विरोधात जाऊन प्रेम विवाह केल्याने त्याने आपल्या बहिणीला मानसिक रुग्ण ठरविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार ९ व १० जानेवारी २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime)
हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी फुरसुंगीतील एका २९ वर्षाच्या प्राध्यापक महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विवेक देवेंद्र तिवारी (वय ३५, रा. काशीगाव, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मुळच्या उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील असून पुण्यात प्रोफेसर म्हणून काम करत आहे. त्या मुंबईत माहेरी रहात असताना त्यांच्या वहिनीच्या भावाबरोबर त्यांचे प्रेम जुळले. त्याला घरातील लोकांनी विरोध केला. तेव्हा फिर्यादी या ऑगस्ट २०२२ मध्ये राजस्थानात पळून जाऊन त्यांनी मंदिरामध्ये लग्न केले.
त्यानंतर त्या ठाण्यात राहू लागल्या. त्यानंतर त्यांचा भाऊ विवेक तिवारी याने मोबाईल हॅक करुन त्यांचे लोकेशन प्राप्त केले. त्यांना त्याने जबरदस्तीने चैतन्य मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केले. तेथे त्यांचा आय क्यु टेस्ट करण्याचा आग्रह केला. डॉक्टरांनी त्यांचा आय क्यु टेस्ट करुन प्रकृती चांगली असल्याचे सांगून भावाच्या ताब्यात दिले. त्यांनी मुंबईतील मिरा रोड येथील त्याच्या घरी जबरदस्तीने ठेवले. त्यानंतर ३ जानेवारी २०२३ पासून त्यापुन्हा आपल्या पतीकडे पुण्यात राहण्यास आल्या.
दरम्यानच्या काळात विवेक तिवारी याने आपला मोबाईल चोरीला गेला असे सांगून १८ सप्टेबर २०२२ पासून त्यांचा मोबाईलचे सीम कार्ड भाऊ विवेक तिवारी वापरु लागला. त्यावर फिर्यादी यांच्या सर्व बँक खात्याचे नंबर नमूद होते. भावाने त्यांना चैतन्य मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केल्याने त्यांचाही मोबाईल भाऊ वापरत होता. या काळात त्याने फिर्यादी यांच्या खात्यातून वेळोवेळी एटीएममधून पैसे काढले. तसेच ४ लाख १९ हजार रुपये आईवडिलांच्या खात्यात वर्ग करुन फसवणूक केली.
मानसिक छळ करण्यासाठी व आर्थिकदृष्ट्या अस्थीर करण्यासाठी तसेच पतीला सोडून देण्याच्या उद्देशाने भावाने हा सर्व प्रकार करुन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा गुन्हा हडपसर पोलिसांनी दाखल करुन कोथरुड पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.