इंदापूर / दीपक खिलारे : भारत हा कृषिप्रधान देश आहे. परंतु या देशाला कृषी मंत्री नाही, देशाला शरद पवार हे कृषिमंत्री म्हणून दहा वर्ष मिळाले. त्यांनी तुमच्या आशीर्वादाने काम केले. त्यानंतर देशात परिवर्तन झाले नवीन मंत्री आले. परंतु आज कृषी मंत्रिपद रिक्त आहे. हे आपले दुर्दैव असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
इंदापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान भव्य कृषी, जनावरे प्रदर्शन, घोडे बाजार व डाॅग शोचे आयोजन केले होते. आजच्या शेवटच्या दिवशी सांगता समारंभ व बक्षीस वितरण समारंभात सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्यांनी आमदार दत्तात्रय भरणे व यशवंत माने यांच्यासमोरच राज्य व केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली.
त्या म्हणाल्या, कांद्याची परिस्थिती काय आहे? दुधाची परिस्थिती काय आहे? या प्रश्नावर आवाज उठवला. कांद्याला भाव मागितला माझे चुकले का? तर माझे लोकसभेत पहिल्यांदा निलंबन झाले. माझे काय चुकले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच तीनवेळा तुम्ही मोठ्या संख्येने मला मतदान करून खूप मोठी संधी व जबाबदारी दिली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासोबत काम केले. गेली पंधरा वर्षे मी जनतेची सेवा करण्याचा प्रमाणिकपणे प्रयत्न करत आहे.
‘एक रुपयाचा कडीपत्ता, सोलापूरचा खासदार बेपत्ता’
यावेळी मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांना बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही माझ्याबद्दल चांगले बोललात. माझ्या कामाचे कौतुक केले. परंतु, लोकप्रतिनिधीचे कामच असते लोकांची कामे करणे, तुमच्या सोलापूरच्या खासदारांबद्दल तर लोक काय काय बोलतात, ते मतदारसंघातही नसतात आणि लोकसभेतही, ‘एक रुपयाचा कडीपत्ता, सोलापूरचा खासदार बेपत्ता’ असे म्हणत त्यांनी खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्यावर टीका केली.
यावेळी बोलताना इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले. या शेतकरी मेळाव्यामुळे परिसरात नागरिकांना विविध तंत्रज्ञान माहिती होणार आहे. त्यामुळे इंदापुरात सहकार मजबूत करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मोहोळचे माजी आ. राजन पाटील, आ. दत्तात्रय भरणे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन तथा संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी केले तर आभार उपसभापती रोहित मोहोळकर यांनी केले.
या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास माने, आ. तथा संचालक यशवंत माने, दत्तात्रय फडतरे, संदिप पाटील, संतोष गायकवाड, मधुकर भरणे, संचालिका रुपाली वाबळे, मंगल झगडे तसेच प्र. सहा. निबंधक, मिलींद राऊत, प्र. सचिव संतोष देवकर व कर्मचारी वृंद व महेंद्र रेडके, कांतीलाल झगडे यांच्यासह इतर मान्यवर तसेच शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.