पुणे : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघावर त्यांनी दावा केला आहे. त्याठिकाणी मी जो उमेदवार देईन, त्याला विजयी करा, असे आवाहन करत, खासदार निवडून आणण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. या मतदारसंघावर विशेष लक्ष देऊन गाठीभेटी घ्यायलाही त्यांनी सुरूवात केली आहे. याच दरम्यान, झालेल्या एका मुलाखतीमध्ये इंदापूर येथील भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. अजित पवार महायुतीत आले असले तरी इंदापूर विधानसभेची कोणी चिंता कोणी करू नये. बारामती लोकसभेत महायुतीचा उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर उतरेल, हे महायुतीत अद्याप ठरलेले नाही, असे म्हणत पाटील यांनी अजित पवार यांना डिवचले. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडेच देण्याचा मोठा निकाल दिला. पण या निर्णयामुळे माझ्या मनात कोणतीही अशांतता निर्माण झालेली नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. तुम्ही भाजपमध्ये आल्यानंतर तुम्हाला शांत झोप लागत होती, पण अजित पवार महायुतीत आल्यानंतर तशीच शांत झोप लागते का? असा प्रश्न विचारल्यावर, ‘माझ्या मनात कोणतीही अशांतता निर्माण झालेली नाही, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. तसेच बारामती लोकसभेत महायुतीचा उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर उतरेल, हे महायुतीत अद्याप ठरलेले नाही’, असे म्हणत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, बारामती मतदारसंघाचे नेतृत्व सध्या सुप्रिया सुळे करत असून, त्यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहणार असल्याची चर्चा आहे. तर बारामती मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनीही तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी हा मतदारसंघ कुणाला मिळणार यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगत आता अजित पवारांना डिवचले आहे.
अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता. त्यानंतर महायुतीमध्ये या जागेवर अजित पवार गटाकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे. दत्ता भरणे हे अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यामुळे इंदापुरच्या जागेवरून भाजप आणि अजित पवार गटामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.