युनूस तांबोळी
शिरुर : रासायनिक खते व किटकनाशके यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला असून, मधमाशांचे अस्तित्व संपुष्टात येऊ लागले आहे. फळ, फलोत्पादन करण्यासाठी परागीभवन महत्त्वाचे आहे. राज्यात शेती उत्पादनासाठी मधमाशा विकसित होणे गरजेचे आहे, असे मत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी व्यक्त केले.
नारायणगाव (ता. जुन्नर) येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने ग्लोबल कृषी जिल्हा महोत्सव २०२४, पीक प्रात्यक्षिक, कृषी प्रदर्शन तसेच परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषी रत्न अनिल मेहेर होते. या वेळी आमदार अतुल बेनके, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, संचालक संजय काळे, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर, ‘एनएचबी’चे उपसंचालक डॉ. एस. के. रॉय, प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, विनायक तांबे, गुलाबराव नेहरकर, एन. एम. काळे, रमेश भुजबळ, डॉ. प्रशांत शेटे, प्रकाश पाटे, रवींद्र पारगावकर, सुजीत खैरे, डॉ. आनंद कुलकर्णी, शशिकांत वाजगे, डी. के. भुजबळ, रत्नदीप भरवीकर, ऋषीकेश मेहेर, देवेंद्र बनकर आदी उपस्थित होते.
या वेळी शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणारे शेतकरी कृषी सहाय्यक, पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला. ‘मायक्रो ग्रीन’ माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहबूब काझी व सुनील ढवळे यांनी केले. गुरुवार (ता. ८) ते रविवार (ता. ११) पर्यंत हे कृषी दर्शन सुरू राहणार आहे. यामध्ये सर्वांसाठी बक्षिसांची सोडत, विविध जातीच्या झाडांची रोपे व वेगवेगळ्या पिकांची पहाणी, परसबाग पहाण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
शेतकरी सुखी होण्यासाठी राजकर्त्यांनी काम करावे
डिंभा व माणिकडोह या दरम्यान भुयारी कालवा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातून भविष्यात या भागाला पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. कांदा निर्यात बंदीच्या धोरणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून समस्या सोडविण्याचे काम करण्यात आले असून, ‘शिवनेरी हापूस’च्या नामांकनासाठी त्यांनी २६ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबर शेतकरी सुखी होण्यासाठी राजकर्त्यांनी काम करणे आवश्यक आहे.
– अतुल बेनके, आमदार, जुन्नर