पुणेः येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ आणि इंटरनॅशनल स्टार्टअप फाउंडेशन (आयएसएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच पुण्यात गुंतवणूकदारांच्या मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध जागतिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभागी होत, पुण्यातील अनेक स्टार्टअप्सला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डाॅ. मंगेश कराड, डॉ. जे. ए.चौधरी, डॉ. शिवा महेश तंगुतोरू आणि दीनानाथ हरपणाहल्ली यांसारख्या मान्यवरांनी उपस्थिती लावली.
या कार्यक्रमात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली, ज्याने उपस्थितांच्या ज्ञानात भर घातली. तसेच हैदराबादमध्ये आगामी काळात ‘एआय युगातील नाविन्य आणि उद्योजकता’ या विषयावर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्टार्टअप फेस्टिव्हलची ही माहिती देण्यात आली. या आंतरराष्ट्रीय महोत्सवात युरोप, अमेरिका, सिंगापूर, हाँगकाँग, युएई येथील विविध कंपन्यांचे शिष्टमंडळे हजेरी लावणार असून प्रत्येक जण आपापल्या भागातील इकोसिस्टिमला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या गुंतवणुकदारांच्या सर्वांत मोठ्या मेळ्यात जगभरातील 100+ वक्ते, 100+ कंपन्या आणि 10,000+ हून अधिक स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचे काम करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी उपस्थित आयएसएफ गुंतवणुकदारांनी दिली आहे.
याप्रसंगी बोलताना, तंगुतोरू यांनी म्हटले की, देशात अनेक प्रतिभाशाली उद्योजक आहेत. प्रत्येकामध्ये काहीतरी नाविन्य आणि अनेकांना रोजगार मिळवून देण्याची क्षमता आहे. सध्या देशातील प्रत्येक सुशिक्षित तरूणांचा ओढा हा नोकरी मिळविण्याकडे असल्याचे दिसते. परंतु, त्यांनी नवनवीन संकल्पनेसह स्टार्टअप्सकडे वळायला हवे. कारण, त्याच्यामाध्यमातून देशाच्या रोजगारांमध्येही भर पडते. यासाठीच यंदा स्टार्टअप फेस्टचे हैदराबाद येथे आयोजन केले असून त्यासाठी, एमआयटी एडीडीने केलेले सहकार्य उल्लेखनिय आहे.
प्रा.डाॅ.कराड यांनीही याप्रसंगी, देशातील स्टार्टअप्सला आयएसएफ फेस्ट-२०२४ च्या माध्यमातून एक चांगले व्यासपीठ मिळणार असून त्यामाध्यमातून देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन मिळेल असे, मत यावेळी व्यक्त केले.