पुणे : पुणे पोलिसांनी नुकतेच आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उजेडात आणले. या कामगिरीचे देशभरात कैतुक होत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलिसांचे तोंडभरून कौतूक करत २५ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. एकीकडे हा कौतुक सोहळा सुरू असतानाच दुसरीकडे याच पुण्यातील एक भीषण वास्तव समोर आले आहे. शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातील तरुणाईच ड्रग्सच्या गर्तेत अडकल्याचे चित्र आहे. पुण्यातील तरुणींचा ड्रग्स सेवन केलेला एक भयंकर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.
पुण्यातील वेताळ टेकडीवरील हा व्हिडीओ असून, अभिनेते रमेश परदेसी यांनी हा व्हिडीओ समोर आणला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये दोन महाविद्यालयीन तरुणी ड्रग्सच्या आहारी गेल्याचे दिसत आहे. पैकी एक मुलगी बेशुद्धावस्थेत आहे तर दुसरी मुलगी ड्रग्स सेवन केल्याने नशेत बडबडत आहे.
हा व्हिडीओ पोस्ट करत रमेश परदेसी म्हणाले की, पुण्यात शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रभरातून तरुण-तरुणी येत असतात. मात्र, हीच तरुणाई नशेच्या विळख्यात अडकत चालली आहे. वेताळ टेकडीवर आम्ही पळायला आलो होतो. तर इथे महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकणाऱ्या या दोन तरुणी बियर, दारु आणि नशायुक्त पदार्थ घेऊन टेकडीच्या कोपऱ्यात पडल्या होत्या. या तरुणींना आम्ही येथे सुरक्षित जागी घेऊन आलो. हे यासाठी सांगतोय कारण पुण्यात दोन दिवसांपूर्वी ४ हजार कोटींचे ड्रग्ज सापडले आहे. शिक्षणाचे आणि संस्कृतीचे माहेरघर असलेले पुणे शहर हे आता नशेचे माहेरघर होतेय का? याचा गंभीरपणे विचार करायला हवा, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
रमेस परदेशी यांनी या व्हिडीओमध्ये बोलताना हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचे आवाहनही त्यांनी पालकांना केले आहे. आपण एक पालक, सजग नागरिक, भाऊ, बहिण म्हणून याकडे गांभीर्याने बघणार आहोत की नाही. यापूर्वी ड्रग्ज माफीया ललीत पाटील सापडला आणि आता हे प्रकरण समोर आले. त्याचा केवळ राजकारणासाठीच वापर झाला. पण यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे, याचा आपण गांभीर्याने विचार करावा. अन्यथा पुण्याचा उडता पंजाब व्हायला वेळ लागणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.