पुणे : तीन वर्ष होऊन गेले तरी अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. सुरुवातीला कोरोनाचा संसर्ग आणि नंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून या निवडणुका रखडून राहिल्या आहेत. मात्र, पुढील काही महिन्यांमध्ये या निवडणुका होतील असे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुका महाविकास आघाडी आणि महायुती एकत्रित सामोर जाणार की स्वबळाचा नारा दिला जाणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून आहे.
अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वेळ पडल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची देखील तयारी असल्याचे म्हटले आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात महाविकास आघाडी फुटणार का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, “येत्या दोन ते तीन महिन्यात राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अपेक्षित आहेत. कारण सत्ताधाऱ्यांना लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांचा वापर करून घ्यायचा होता तो आता संपलेला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच होतील, अशी आशा असल्याचं जगताप यांनी सांगितलं आहे.
जगताप पुढे म्हणाले की, राज्यातील 24 महापालिका, 27 जिल्हा परिषद, 300 साडेतीनशे नगरपरिषद आणि पंचायत समितीवर गेले तब्बल तीन वर्ष प्रशासक नेमण्यात आला आहे. यामुळे या राज्याचा खेळखंडोबा झाला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पूर्ण तयारी केली आहे. पुण्याचा विचार केल्यास पुण्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे. कारण भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी हे शहर लुटण्याचं काम केलं आहे. त्यातून पुणेकरांची सुटका करण्यासाठी चार पावलं मागे येऊन सर्वांचा मान सन्मान ठेवून महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे. असे जगताप म्हणाले.
दुसरीकडे वेळ पडल्यास स्वबळाची तयारी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं ठेवली आहे. कारण कार्यकर्ते गेल्या आठ वर्षापासून निवडणुकीची तयारी करीत आहेत. मागील निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर हे कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पुण्यातील सर्व जागासाठी आम्ही तयारी केली आहे. परंतु, भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढू आणि महापालिकेत महाविकास आघाडी म्हणून पुनरागमन करू, असे जगताप यांनी सांगितले.