पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अशातच आता मराठ्यांना कशाला हवंय आरक्षण असा सवाल संभाजी भिडे यांनी केला. त्यावर राजकीय चर्चाना उधाण आले आहे. त्यावर आता शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. संभाजी भिडे काही बोलण्याच्या लायकीचे व्यक्ती आहेत का? असं म्हणत शरद पवार प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवरच भडकले आहे. मराठ्यांनी आरक्षण का मागावं? मराठ्यांना देश चालवायचा आहे, मराठा ही देशाचा संसार चालवणारी जात आहे असं विधान संभाजी भिडे यांनी केलं होतं. त्यावर बोलताना शरद पवारांनी हे भाष्य केलं आहे.
संभाजी भिडे काय म्हणाले?
संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली होती. सांगलीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. मराठ्यांनी आरक्षण मागावे का? असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केला होता. मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे, पण मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठे आले? मराठा जात संपूर्ण देशाचा संसार चालवणारी जात आहे, हे जेव्हा मराठ्यांच्या लक्षात येईल त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून निघेल. मात्र हे मराठ्यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैव आहे, असं संभाजी भिडे म्हटले होते.
शरद पवार संतापले..
संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्यावर पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार भडकले. संभाजी भिडे हे काही बोलण्याच्या लायकीचे व्यक्ती आहेत का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.