पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून प्रकरणी रोज नवनवीन खुलाशे समोर येत आहेत. आंदेकरचा खून करण्यासाठी गुंड सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी दीड महिन्यापूर्वीच मध्य प्रदेशातून ९ पिस्तुले आणल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे आंदेकर यांचा खून पूर्वनियोजित कट रचून केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना पिस्तुले पुरविल्याप्रकरणी, अभिषेक उर्फ आबा नारायण खोंड (वय २४, रा. लक्ष्मी गार्डन सोसायटी, देशमुखवाडी, शिवणे) याला अटक केली आहे. आदेकर खून प्रकरणात आतापर्यंत २९ आरोपींना अटक झाली असून, दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत बोलताना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुंड सोमनाथ गायकवाड, कोमकर कुटुंबीय यांनी वनराज आंदेकर यांचा खून करण्याचे ठरविले होते. त्यापूर्वी दीड महिने अगोदरच त्यांनी ९ पिस्तुले आणून ठेवली होती. ही पिस्तुले मध्यप्रदेशातून आणण्याची जबाबदारी सोम्याच्या टोळीतील सदस्य समीर काळे, आबा खोंड, आकाश म्हस्के, संगम वाघमारे यांच्यावर देण्यात आली होती.
हे चौघे एका चारचाकी मोटारीतून धुळे मार्गे मध्यप्रदेशात गेले. तेथून त्यांनी ९ पिस्तुले आणली. आंदेकर यांचा खून करण्याची तयारी कोमकर कुटुंबीय आणि सोम्या गायकवाड टोळीने दोन महिन्यांपासून वेगाने सुरू केली होती.