पुणे: राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर काही उपायुक्त अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली होण्याची शक्यता होती. गुरुवारी रात्री गृहविभागाकडून काही पोलीस अधीक्षक आणि उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आलाय आहेत. यामध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर संदीपसिंग गिल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर या बदलीच्या विरोधात पंकज देशमुख यांनी कॅट अर्थात सेंट्रल अॅडमिनीस्ट्रेट ट्रिब्युनलकडे दाद मागितली आहे.
या प्रकरणी कॅटमध्ये आज (दि. ६) सुनावणी पार पडली. सुनावणी झाल्यानंतर कॅटने पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांना पुणे पोलीस अधीक्षक पदावरून मुक्त करण्यात येऊ नये, असे आदेश दिले. कॅटने आपल्या आदेशात म्हटले आहे की, मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालानुसार एखाद्या अधिकाऱ्याची मुदतपूर्व बदली करताना त्याचे कारण देणे आवश्यक आहे. देशमुख यांची पुणे पोलीस अधीक्षकपदी सात महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. देशमुख यांची मुदतपूर्व बदली करताना कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांची बदली करता येणार नाही. आता याप्रकरणी पुढील सुनावणी १९ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे पुणे पोलीस अधीक्षकपदी पंकज देशमुखच राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.