पुणे : अयोध्येत भव्य राम मंदिरात रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळा २२ जानेवारीला मोठ्या दिमाखात होणार आहे. यासाठी १५ जानेवारीपासूनच राम मंदिरात विविध कार्यक्रम आणि विधींना सुरुवात झाली आहे. हजारो मान्यवर आणि सर्व स्तरातील दिग्गज राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला महाराष्ट्रातून शरद पवार, उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवले नसल्याचे आरोप झाले होते. परंतु आता ट्रस्टकडून शरद पवार यांना निमंत्रण मिळाले आहे. ट्रस्टकडून आलेल्या आमंत्रणाबद्दल महासचिव चंपत राय यांचे शरद पवार यांनी आभार मानले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी पाठविलेल्या पत्राला उत्तर देताना खोचक उत्तरही दिले आहे. या उत्तराची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शरद पवार यांनी उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, भगवान राम भारतातीलच नाही तर जगभरातील भक्तांचे श्रद्धास्थान आहे. जगभरातील कोट्यवधी भक्तांची आस्था भगवान राम यांच्यासंदर्भात आहे. अयोध्यातील समारंभासंदर्भात राम भक्तांमध्ये उत्सुकता आहे. यामुळे मोठ्या संख्येने भक्त अयोध्येत येत आहेत. त्यांच्या माध्यमातून या ऐतिहासिक समारंभाचा आनंद माझ्यापर्यंत पोहचणार आहे. अयोध्येत मोठ्या संख्येने रामभक्त येणार असल्यामुळे २२ जानेवारीच्या नंतर रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी मी येणार आहे. माझे अयोध्येला येणे नियोजित आहे. मी अयोध्येत दर्शनासाठी येईन, तोपर्यंत राम मंदिराचे काम देखील पूर्ण झालेले असेल.
दरम्यान, शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्रात ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे आभार मानत असतानाच मंदिराचे काम अपूर्ण असल्याची जाणीव करुन दिली आहे. एकीकडे देशातील नागरिकांचे लक्ष अयोध्येतील सोहळ्याकडे लागले असताना, विरोधकांकडून उणीवा दाखवल्या जात आहेत.
रामजन्मभूमी मंदिर न्यास व विश्व हिंदू परिषदेकडून देशभरातील व्हीव्हीआयपी लोकांना सोहळ्याचे निमंत्रण पाठवले आहे. महाराष्ट्रातून सत्ताधारी व्हिआयपींसोबत विरोधक व्हिआयपींमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह मनसे नेते राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.