पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरातील ४ डॉक्टरांसह ८ गुंतवणूकदारांना तब्बल दीड कोटींचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने चार डॉक्टरांसह आठजणांची एक कोटी ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी एका ६२ वर्षीय डॉक्टर महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून समीर मोहन कुलकर्णी (वय ५०, रा. बावधन), मधुराणी कुलकर्णी (वय ४९) आणि अनिल यशवंत चौधरी (वय ६६, रा. रामबाग कॉलनी, कोथरूड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. फेब्रुवारी २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी डॉक्टर महिलेचे नारायण पेठेत क्लिनिक आहे. त्यांच्या पतीचे मित्र समीर कुलकर्णी पूर्वी शेअर ट्रेडिंगमध्ये मार्गदर्शन करीत असत. कुलकर्णी यांनी नोकरी सोडून पत्नी मधुराणी आणि अनिल चौधरी यांच्यासमवेत कोथरूडमध्ये शेल ॲण्ड पर्ल इन्व्हेस्टमेंट शेअर ब्रोकिंग कंपनी सुरू केली आहे.
कुलकर्णी यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पतीला आमच्याकडे शेअर मार्केटमधील एका योजनेत पैसे गुंतवणूक केल्यास वार्षिक १५ टक्के परतावा मिळेल, असं सानितले. त्यानुसार डॉक्टर महिलेने त्यांच्याकडे वेळोवेळी ३९ लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यांनी काही दिवसांनी परतावा मागितला. मात्र, कुलकर्णी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टर महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
दरम्यान, आरोपींनी इतर ७ गुंतवणुकदारांचीही एक कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यात कोथरूडच्या रामबाग कॉलनी येथील एका डॉक्टरची ४२ लाख रुपये, तर मुंढवा येथील एका डॉक्टरची २५ लाख रुपयांची, खंडाळा (जि. सातारा) येथील डॉक्टरची पाच लाखांची तसेच, इतर गुंतवणूकदारांसह एकूण एक कोटी ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चैतन्य काटकर करत आहेत.