(विमल खामकर – अध्यक्ष, ओबीसी संघटना पुणे जिल्हा)
शिरूर : जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी महिलांना त्यांच्या कामाबद्दल प्रोसाहित केल जाते. आज महिला सर्वच क्षेत्रात कार्य करत आहेत. त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करत आहेत. त्या प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. तरी देखील समाजात अजून देखील त्यांना कमी लेखले जाते. आपल्या पुरुष प्रधान प्रणालीमुळे स्त्रियांना कमी लेखले जाते. हे आता आपल्याला बदलायला हवं. यासाठी महिलांनी संघटीत होऊन पुढील काळाला सामोरे गेले पाहिजे.
जागतिक महिला दिन म्हणून साजरा करून त्यांना गौरव करून चालणार नाही. समाजाने त्यांना संघटीत होण्यासाठी मदतीचा हात दिला पाहिजे. यासाठी महिलांनी संघटीत होऊन आवाज उठवला पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक गणिताची कास धरली आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करू पहात आहेत. वेगवेगळ्या व्यवसायाला कर्ज मिळू लागल्याने त्यात त्यांचा महत्वाचा वाटा म्हणजे त्यापासून मिळणारा नफा त्यांना दिसू लागला आहे.
शेळी पालन, कुकूटपालन, गाय, म्हैस यासाठी कर्ज घेऊन या व्यवसायात भरभराटी येऊ लागली आहे. कमी व्याजदरात मिळणारे हे कर्ज स्त्री शक्तीसाठी महत्वाचा विषय ठरू लागला आहे. हळूहळ लहान व्यवसायाचे रूपांतर मोठ्या व्यवसायात करण्यासाठी त्यांनी एकत्रीत आले पाहिजे. या व्यवसायाला चांगले दिवस येण्यासाठी त्यांनी प्रयत्नशिल राहिले पाहिजे. संघटीत होऊन हा व्यवसाय चालविला गेला तर यापुढील काळात त्यांना तोट्याला देखील एकत्रीत सामोरे जावे लागेल. त्यातून कमी तोटा होईल.
शेती व्यवसायात देखील या कर्जाचा चांगला फायदा होऊ पहात आहे. कर्ज आणि त्यावरील कर्जाची परतफेड या बाबतचे नियोजन देखील महत्वाचे आहे. शेती व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. बाजारभावामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतीत मुख्यतः महिलाच नियोजन करत असतात. पण यामध्ये संघटन नाही त्यातून शेतात काय पिकते यापेक्षा बाजारपेठेत काय विकते याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.
मात्र कोणतेही नियोजन नसल्याने शिवाय संघटीत नसल्याने त्याने पिकवले की आपणही तोच उपक्रम राबवायचा यामधून मोठ्या प्रमाणात एखाद्या पिकाचे उत्पादन होते. त्यामुळे मागणी पेक्षा पुरवठा वाढतो. आणि बाजारभाव पडतो. त्यातून सगळ्यांनाच तोट्याला सामोरे जावे लागते. हेच आपन महिलांनी संघटीतपणे विचार करणे आवश्यक आहे.
महिलांचे हे असे संघटन करून एकत्रीत असले की कोणत्याही समस्यांना सामोरे जाण्याची ताकद निर्माण होईल. भविष्यात तयार होणाऱ्या अनेक समस्या ह्या त्रासदायक ठरणार नाही. कोणत्याही क्षेत्रात ठामपणे काम करायचे असेल तर त्यासाठी संघटन असणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या खात्यात संघटना तयार झाल्या आहेत. त्या बरोबर महिलांचे संघटन झाल्यास समाज देखील याची दखल घेईल. त्यातून आपल्या विचारांचा आदर केला जाईल. अन्यथा पुरूष संस्कृती यापुढे ही आपल्याला दुय्यम दर्जा देतील हे महिलांनी विसरता कामा नये.
शब्दांकन : युनूस तांबोळी