पुणे : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडताना दिसत आहे. अशातच पुण्यामध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विधानसभेच्या उमेदवारीवरून पुण्यामध्ये भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचा पाहायला मिळत आहे. पुण्यातील सहाही जागांपैकी ५ जागांवर विद्यमान आमदारांनाच पसंती असल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीसोबतच संतापाची लाट उसळली आहे.
काही भाजपचे नगरसेवक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांच्यामध्येच उमेदवारीवरून नाराजी असलयाचे समोर आले आहे. अशामध्येच खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे बघायला मिळत आहे.
भाजपच्या माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा भाजपच्या वरिष्ठांकडे व्यक्त केली आहे. गेली १५ वर्षे नगरसेवक असताना आपण लोकांची कामं केली आहेत. त्यामुळे मला विधानसभा निवडणूक लढवायची आहे. अशी इच्छा त्यांनी वरिष्ठांकडे व्यक्त केली. मंगळवारी पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवकांची आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची शहर कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीत त्यांनी ही मागणी पुढे केली.
भाजपने यावेळी उमेदवार बदलावा..
खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीत भाजपने यावेळी उमेदवार बदलला पाहिजे, तरच ही जागा आपण जिंकू अशी मागणी काही माजी नगरसेवकांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपचा खडकवासल्याचा उमेदवार कोण असणार? पक्ष नेमकी कोणाला संधी देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी टी रवी, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अजय जामवाल, माजी संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे हे पदाधिकारी उपस्थित होते.