पुणे : बहिणीने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून तिच्या भावाने नातेवाईकांच्या मदतीने मेहुण्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील पिंपरी-चिंचवडच्या मोशी जवळील जंगलात घडली. या हत्येमागे बहिणीचा भाऊ आणि दुसऱ्या बहिणीचा नवरा असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. भोसरी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. तर एक आरोपी सध्या फरार आहे.
या प्रकरणात अमीर मोहम्मद शेख असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अमीरच्या पत्नीचा भाऊ सुशांत गोपाळ गायकवाड, मेहुणा गणेश गायकवाड व पंकज विश्वनाथ पाईकराव असे आरोपींची नावे आहे. यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर एक जण फरार आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून अमीर शेख आणि निकिताचे प्रेमसंबंध सुरु होते. दोघे ही एकाच गावात राहत होते. त्यांच्या या प्रेमविवाहाला गायकवाड कुटुंबाची संमती नव्हती. कुटुंबाच्या विरोधात जाऊन दोघांनी आंतरधर्मीय विवाह केला. गावात राहिल्याने आणखी वाद उदभवू शकतो. यामुळे ते पुण्यात राहायला गेले. पाच- सहा महिन्यांपासून दोघे ही पुण्यातील मोशी येथे सुखी संसार करत होते.
याच दरम्यान, निकिता उर्फ अरीना हिच्या बहिणीच्या पतीने अमीर सोबत जवळीक वाढवली. 15 जून रोजी अमीर शेख हा कंपनीत जातो म्हणून घराबाहेर पडला. तेव्हा, साडु पंकज पाईकराव ने त्याला मद्यपान करण्यास पुणे – नाशिक रोडवरील एका हॉटेल मध्ये बोलावलं. तिथे दोघे जण दारू प्यायले. अमीर हा कंपनीत जाण्यास निघाला तेव्हा पुन्हा त्याला दारू प्यायचा आग्रह हा सुशांत आणि गणेश गायकवाड यांनी केला. पुन्हा, हॉटेलमधील दारू नेऊन सर्व जण आळंदी- चाकण रस्त्या जवळील जंगलात बसून प्यायला लागले. सुशांत ने पंकज ला फोन करून बाजूला जाण्यास सांगितले. सुशांत व गणेशने यानंतर अमीरला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने अमीरच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी अमीरच्या मृतदेहावर डिझेल टाकून मृतदेह पेटवून दिला. तसेच त्याची हाडे व राख हे गोणीत भरून नदीत फेकून दिली.
त्यानंतर, अमीर घरी आला नसल्याने पत्नी निकिता उर्फ अरीनाने या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. तर अमीर सोबत घात पात झाल्याचा संशय अमीरचे वडील मोहम्मद शेख यांनी व्यक्त केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी पंकज व सुशांतला लोणावळा परिसरातून अटक केली आहे. गणेश गायकवाड हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, आमीरचा मृतदेह जाळण्यासाठी डिझेल देणाऱ्या व्यक्तीला ही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणीचा हा सर्व कट निकिता उर्फ अरीना चा भाऊ सुशांत गायकवाड याने रचला असल्याचा पोलीस तपासात उघड झाले आहे.