संतोष पवार
पळसदेव : राज्यातील नागरिकांना पुरेशा दर्जेदार आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी शासनाच्या वतीने विविध आरोग्य योजना राबवल्या जातात. त्याच अनुषंगाने राज्यात एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व व केंद्र शासनाची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्यान्वित आहेत. राज्य आयोग विमा संस्थेमार्फत पात्र लाभार्थी कुटुंबाच्या वतीने दरवर्षी विमा कंपनीला प्रति कुटुंब रुपये 797 इतकी रक्कम त्रैमासिक विमा हप्ता म्हणून भरली जाते.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून संपूर्ण निधी प्राप्त होतो. तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेकरिता होणाऱ्या खर्चाची विभागणी केंद्र व राज्य शासन यांच्यात ६०:४० या प्रमाणात करण्यात येते. आता केंद्र व राज्य सरकारच्या या दोन्ही आरोग्य योजना एकत्र करून आयुष्यमान भारत आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमार्फत पात्र शिधापत्रिका धारक आणि लाभार्थी गटांना सूचीबद्ध आजारांवर मोफत वैद्यकीय पुरवण्यात येत आहे. या सेवायोजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे. त्याकरिता नागरिकांना आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड काढून घेणे आवश्यक आहे. सदरच्या योजनेमध्ये 1356 हजारावर उपचार मोफत मिळणार असून पांढरे, केसरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांचा देखील या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
या दोन्ही आरोग्य योजनांच्या एकत्रीकरणामुळे लाभार्थ्यांना आता पाच लाखापर्यंतचे विमा कव्हरेज मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील 68 रुग्णालयात ही योजना लागू असून त्यामध्ये 12 खाजगी रुग्णालयांचा देखील समावेश आहे. ज्या रुग्णालयांमध्ये ही योजना लागू आहे त्या रुग्णालयात आयुष्यमान भारत योजनेचे स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी भेट देऊन नागरिक या योजनेअंतर्गत कोणत्या आजारांवर उपचार होईल, याची माहिती घेऊ शकतात. यासंदर्भातील आढावा बैठक घेऊन सदरच्या योजनेचे लाभ मिळवण्यासाठी आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढून घेण्याचे आवाहन भारत मिशनचे राज्याचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी केले आहे.