पुणे: विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना दर महिना 1500 रुपये देण्यात येत आहेत. दरम्यान, महायुतीने राज्याच्या विधानसभा निवडणुकीत 1500 रुपयांची ही रक्कम वाढवून 2100 रुपये करणार, असे जाहीर आश्वासन दिले होते. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सत्तेत आली आहे, यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणांना 2100 रुपये केव्हापासून पासून मिळणार यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे.
यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देणार हे आश्वासन देण्यात आले होते. ते आश्वासन महायुती पूर्ण करणार आहे. जर आम्ही हे आश्वासन पूर्ण केले नाही, तर संपूर्ण देशभरात आमची प्रतिमा देशाभरात खराब होईल. निवडणुका झाल्या की, आम्ही आश्वासन पूर्ण करत नाहीत, अशी आमची प्रतिमा तयार होईल. मी स्वतः याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. आम्ही दिलेल्या शब्दावर ठाम राहायला हवे. महायुतीच्या जाहीरनामा समितीचा मी अध्यक्ष होतो. त्यामुळे महायुतीने दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहोत.
दिलेली आश्वासने धुळीस मिळू देणार नाहीत. महायुतीच्या सरकारमध्ये राज्यातील लाडक्या बहिणांना 2100 रुपये देण्याची क्षमता आहे. महायुतीमध्ये सामील असलेला एकही पक्ष आमच्या 2100 रुपये देण्याच्या योजनेला कोणताही विरोध करणार नाही. येत्या जानेवारी की जुलै किंवा कोणत्या महिन्यापासून 1500 रुपयांमध्ये वाढ करुन 2100 रुपये देण्यास सुरुवात करायची, याबाबत सरकार स्थापन झाल्यावर चर्चा करण्यात येईल. महायुतीने गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना सुरु केली होती. त्यामुळे सरकार पुढील वर्षीच्या भाऊबीजेपासून 2100 रुपये ही रक्कम देऊ शकतो, असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.