पुणे : जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या २८ जून पासून सुरु होत आहे. दौंड तालुक्यातील यवत येथे ३ जुलै तर, वरवंड येथे ४ जुलै रोजी श्री तुकाराम महाराज पालखी मुक्कामी आहे. या पार्शवभूमीवर आमदार राहुल कुल यांनी आज पालखी तळ, कालभैरवनाथ मंदिर यवत आणि विठ्ठल मंदिर वरवंड येथे तयारीची व अनुशांघिक कामाची पहाणी केली.
यावेळी पालखी मार्गावरील अनावश्यक झाडे – झुडपे काढून टाकावीत, रस्त्यावरील खड्डे बुजवून साईडपट्ट्या भरून घ्याव्यात, महावितरणने वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, जलसंपदा विभागाने व पाणीपुरवठा विभागाने यंत्रणा तैनात ठेवावी, पंचायत समिती व आरोग्य विभागाने फिरते शौचालय, अतिदक्षता विभागाचे बेड, रुग्णवाहिका, आरोग्य तपासणी केंद्र, स्वच्छतागृह, पालखीतळाची स्वच्छता व आवश्यक ठिकाणी मुरमीकरण करून घ्यावे.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत, वनविभागाने वृक्षारोपणाचे काम हाती घ्यावे, पथदिव्यांची सोय करत आपत्कालीन कक्ष उभारावा, पोलिसांनी वारीच्या दरम्यान चोरीचे प्रकार घडू नये तसेच वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना आमदार राहुल कुल यांनी यावेळी दिल्या.
यावेळी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हरीश्चंद्र माळशिकारे, मयूर सोनवणे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका आरोग्य अधिकारी उज्वला जाधव, पंचायत समितीचे उपअभियंता दत्तात्रय पठारे, भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, वरवंडचे माजी सरपंच गोरख दिवेकर, यवतचे सरपंच समीर दोरगे, बाजार समितीचे संचालक अशोक फरगडे, बाळासाहेब लाटकर आदी उपस्थित होते.