पुणे: पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची त्याच्या लग्नाच्या वाढदिवशीच गोळ्या घालून हत्या झाली. या हत्या प्रकरणात पोलीस तपासातून दररोज नवीन नवीन महिती समोर येत आहे. या हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीला मुख्य आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर असल्याचे समोर आले. त्यानंतर मुन्नाचा मामा नामदेव कानगुडे याचे नाव हत्या प्रकरणात समोर आले. त्यानंतर मोरणे टोळीतील रामदास मारणे हा मास्टरमाइंड असल्याचे समोर आले. परंतु, हे तिघे नाही तर चौथाच व्यक्ती मास्टरमाइंड निघाला. मुळशी तालुक्यामधीलच गुंड विठ्ठल शेलार हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. या दोघांमध्ये काय वाद होते, ते पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
मोहोळ हत्या प्रकरणात भाजपचा पदाधिकारी असलेल्या विठ्ठल शेलारसह 24 जणांना आतापर्यंत अटक केली आहे. मोहोळ आणि शेलार हे दोघेही भाजपशी संबंधित होते. मात्र, दोघांमध्ये मुळशी तालुक्यातील वर्चस्वावरून असलेला वाद या हत्येला कारणीभूत ठरल्याचा पुणे पोलिसांचा दावा आहे. त्याचबरोबर शरद मोहोळच्या हत्येला मुळशी तालुक्यातील वेगरे गावच्या सरंपचपदाचा वाद देखील कारणीभूत असल्याचं आले आहे.
पुण्यातून लवास सिटीकडे जाताना वाटेत लागणारे मुठा नावाचे गाव हे शरद मोहोळच तर तिथून पुढे पंचवीस किलोमीटर अंतरावरील वेगरे नावाचं गाव हे नामदेव कानगुडेच. तर मुठा गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेलं उरवडे गाव आहे, ते या हत्येतील दुसरा मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलारचे आहे. मुळशी खोऱ्यातील या लहान – लहान गावांमध्ये वर्चस्व कोणाचं राहणार यातून निर्माण झालेल्या वादातून शरद मोहोळची हत्या झाल्याचं समोर आले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीवरून वाद
2010 मध्ये नामदेव कानगुडेकडून एका वादातून शरद मोहोळच्या मावस भावाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर शरद मोहोळने त्याचा बदला घेण्यासाठी नामदेव कानगुडेला मारहाण केली. पुढे जाऊन दोघांमध्ये समझोता झाला आणि दोघे एकत्र काम करायला लागले. मात्र, गेल्या वर्षी वेगरे गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत नामदेव कानगुडेची भावजय निवडणुकीला उभी राहिली होती. त्यावेळी कानगुडे याने शरद मोहोळकडे त्यासाठी मदत मागितली. मात्र ती न मिळाल्यानं दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यामधून अपमानित झालेला नामदेव कानगुडेला रडताना त्याचा भाचा असलेल्या साहिल पोळेकरने पाहिलं आणि दोघांनी मिळून शरद मोहोळचा काटा काढायचा त्यावेळीच ठरवलं.
दरम्यान शरद मोहोळच्या टोळीतील धुसफूस शरद मोहोळचा विरोधक असलेल्या विठ्ठल शेलारला समजली. 2017 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या विठ्ठल शेलारची टोळी हिंजवडी आयटी पार्कच्या परिसरात सक्रिय होती. मात्र, 2021 ला तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शरद मोहोळने शेलारच्या भागात शिरण्याचा करण्याचा प्रयत्न केला. त्यातून झालेल्या वादातून शेलारच्या गाडीवर शरद मोहोळच्या साथीदारांनी पुणे-मुंबई हायवेला असलेल्या सयाजी हॉटेलजवळ ऑक्टोबर 2022 मध्ये हल्ला केला होता. विठ्ठल शेलारला त्यावेळी कसाबसा जीव वाचवून पळ काढावा लागला.
या दरम्यानच शरद मोहोळच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि विठ्ठल शेलार तर आधीपासूनच भाजपमध्ये होता. मात्र एकाच पक्षात असलेल्या या दोघांच्या टोळ्यांमधील संघर्ष वाढत चालला होता. त्यातूनच विठ्ठल शेलारने नामदेव कानगुडेला शरद मोहोळची हत्या आणि कट रचण्यात मोठी मदत केली. तर अवघ्या वीस वर्षांच्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकरने शरद मोहोळवर गोळ्या झाडून आपल्या मामाचा बदला घेतला. त्यासाठी पोळेकरने अनेक दिवस शरद मोहोळच्या पुढे मागे करून त्याचा विश्वास संपादन केला होता.
मारणे गँगने घेतला बदला?
शरद मोहोळने किशोर मारणेची 2010 मध्ये हत्या करून संदीप मोहोळच्या हत्येचा बदला घेतला होता. किशोर मारणेच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मारणे टोळीने देखील शरद मोहोळच्या हत्येसाठी नामदेव कानगुडेला मदत केल्याचा पोलिसांना संशय असून आता त्यादिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.