लोणी काळभोर (पुणे): सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाला अवघ्या ३ महिने झाले आहेत. ही घटना कुठे मनातून जात नाही, तोवरच सतीश वाघ हत्या प्रकरणाची पुनुरावृत्ती लोणी काळभोरमध्ये झाली आहे. अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी रस्त्यावरील वडाळे वस्ती परिसरात सोमवारी (ता.31) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
शोभा रविंद्र काळभोर (वय 42), गोरख त्र्यंबक काळभोर (वय 41, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) अशी आरोपींची नावे आहेत. रवींद्र काशिनाथ काळभोर (वय 45, वडाळे वस्ती , टाकेचा माळ, रायवाडी रोड, लोणी काळभोर) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे
रवींद्र काळभोर हे पत्नी शोभा हिच्यासोबत लोणी काळभोर परिसरात राहत होते. त्यांना 21 वर्षाचा मुलगा व 19 वर्षाची मुलगी आहे. रवींद्र हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रवींद्र आणि आरोपी गोरख काळभोर हे दोघेही शेतकरी. ते दोघेही शेतकरी असल्याने त्यांच्यात मैत्री झाली होती. त्यामुळे गोरखचे रवींद्रच्या घरी नेहमी येणे जाणे सुरु होते. दोन्ही कुटुंब बाहेर फिरायलासुद्धा एकत्र जायचे. शेतीच्या कामानिमित्त शोभा आणि गोरखची घरी आणि शेतात भेट होत होती. या ओळखीतून शोभा आणि गोरखची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर लवकरच प्रेमात झाले.
शोभा आणि गोरखचे गेल्या 2 वर्षांपासून अनैतिक संबंध होते. गोरख हा माझा भाऊ आहे, असं शोभा म्हणत होती. या गोष्टीचा फायदा घेऊन ती गोरखसोबत एकटी फिरायलासुद्धा गेली होती. परंतु, सत्य कधी लपत नसते. अखेर रवींद्रला या दोघांच्या प्रेम संबंधाची चाहूल लागली. शोभाचे गोरखबरोबर वारंवार फोनवर बोलणे, भेटणे हे रवींद्रला खटकत होते. यामुळे शोभा आणि रवींद्रमध्ये वारंवार भांडण व्हायचे. यातूनच रवींद्र हा शोभाला शिवीगाळ करून मारहाण करायचा. तसेच शोभाला वारंवार सांगूनही ती ऐकत नव्हती. त्यामुळे रवींद्र हा व्यसनाधीन झाला. रवींद्र दारू पिऊन आल्यानंतर त्यांच्यात या विषयावरून नेहमी भांडण होत होते. रवींद्र हा शोभाचा पाठलाग करायचा. तिच्यावर नजर देखील ठेऊ लागला. त्यामुळे गोरख आणि शोभला भेटण्यासाठी अडचणी येऊ लागल्या.
रवींद्रने गोरखला शनिवारी (29 मार्च 2025) घरी जेवण करायला बोलावलं होतं, त्यासाठी खास मटणाचा बेत करण्यात आला. परंतु, त्यांच्यात प्रेम प्रकरणावरून पुन्हा जोरदार भांडण झाले. या भांडणात रवींद्रच्या शर्टची बटणे देखील तुटली होती. या वादामुळे शोभा आपल्या मुलांना घेऊन माहेरी गेली. शोभा रागाने निघून गेल्याचा राग मनात धरून रवींद्र हा दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३० मार्चला गोरखच्या घरी गेला आणि या प्रेम प्रकरणाची हकीगत गोरखच्या कुटुंबाला सांगितली. त्यामुळे गोरखच्याही घरी कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाची माहिती गोरखने फोनवरून शोभाला दिली. आता या सर्व प्रकरणामुळे हा विषय संपवावा, असे गोरख आणि शोभा यांच्या मनात आले आणि दोघांनी मिळून रवींद्रचा कायमचा काटा काढायचा ठरवलं.
रवींद्र हा सोमवारी (31 मार्च) रात्री एकटाच घरी होता. तो दारू पिऊन घराबाहेरील अंगणात असलेल्या पलंगावर झोपला होता. त्यावेळी गोरख हा रवींद्रला जेवणासाठी डबा घेऊन आला. रात्री सुमारे अकरा वाजता त्याने रवींद्रला जेवण दिले आणि आता तू निवांत झोप, असे रवींद्रला सांगितले. त्यानंतर आसपासच्या परिसराचा गोरखने अंदाज घेतला. सर्वत्र सामसूम होती. रवींद्र गाढ झोपला आहे, अशी माहिती त्याने शोभाला दिली. त्यानंतर शोभाही माहेरहून रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास घरी पोहचली.
दरम्यान, रवींद्रच्या घरी एक पाळीव कुत्रा आहे, शेतातली वस्ती असल्याने तो नेहमी सावध असतो. मात्र, तो शोभा आणि गोरखला ओळखत असल्याने भुंकला नाही. शेजारचे सर्वजण गाढ झोपेत असल्याचे पाहून आरोपींनी रवींद्रच्या डोक्यात धारदार टिकावाने वार केले. या हल्यात रवींद्रच्या मेंदूवर वर्मी घाव बसला. त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाला. यामध्ये त्याचा जागीच मुत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
विशेष म्हणजे या घटनेनंतर सकाळी शोभा आणि गोरख यांच्या चेहऱ्यावर आपण काहीच केले नाही, असा आविर्भाव होता. शोभा तर रडण्याचा आव आणत होती. ती आरडाओरड करून रडतही होती. शोभा आणि गोरख आपण काही केलंच नाही आणि कोणालाही काय समजणारच नाही, अशा भ्रमात होते. पण असं म्हणतात की, असत्य फार काळ टिकत नाही आणि तसंच काहीस झालं. रवींद्र काळभोर यांच्या हत्येनंतर पोलिसांनी आजूबाजूला, तसेच शेजाऱ्यांकडे याबद्दलची चौकशी केली. यावेळी पोलिसांना रवींद्र यांची पत्नी शोभा आणि गोरख यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. यामुळे पोलिसांच्या संशयाची सुई त्या दोघांकडे वळली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन खाक्या दाखवला असता, दोन्ही आरोपींनी लगेचच खुनाची कबुली दिली.
कारभाऱ्याची शिकार त्याच्या कारभारणीनेच केली, जिवलग मित्रानेच प्रेम संबांधात अडथळा ठरणाऱ्या मित्राचा खून केला आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी अशीच घटना शेवाळवाडी हद्दीत घडली होती. सतीश वाघ यांची पत्नी आरोपी मोहिनी वाघ हिने तिच्या प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन पतीचा काटा काढला होता. त्यावेळेस मोहिनी वाघ ही हंबरडा फोडून रडत होती. अगदी त्याच प्रकारे शोभा ही रडण्याचे नाटक करत होती. या दोघींनीही सिनेमातील अभिनेत्रीला लाजवेल असा अभिनय पतीच्या मृत्यूनंतर केला. परंतु, पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून कोणीच सुटत नाही. शोभाचे हे रडणे एक प्रकारचे नाटक होते. त्यामुळे असे म्हणावे लागेल की, अनैतिक संबंधाचा शेवट हा वाईटच होतो. दोन्ही कुटुंब होरपळून निघतात, हेच या घटनांनी दाखवून दिले आहे.