पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची शुक्रवारी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने पुण्यासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा वेगवान तपास करत आठ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यातील मुख्य आरोपी साहील उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याला देखील शिरवळमधूनच पोलिसांनी ताब्यात घेतलं. गुंड शरद मोहोळची हत्या कशी झाली, हे आता समोर आले आहे. शरद मोहोळची सावली म्हणून वावरणाऱ्यांनीच त्याचा गेलं केला. त्याने ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्याकडून आयुष्याची आपल्या अखेर होईल, अशी पुसटशी जाणीवही शरद मोहोळला आली नाही.
शुक्रवारी 5 जानेवारी रोजी दुपारी शरद मोहोळ जेव्हा घराबाहेर पडला तेव्हा विठ्ठल गांडले, नितीन कानगुडे आणि साहील पोळेकर हे त्याचे साथीदार बॉडीगार्ड म्हणून त्याच्यासोबत चालायला लागले. पण, आपले बॉडीगार्डच आपला थोड्याच वेळात काटा काढणार आहेत, याची शरद मोहोळला कल्पना नव्हती. लग्नाचा वाढदिवस साजरा करुन सुतारदरा भागातील घरातून बाहेर पडलेला शरद मोहोळ काही पावले चालतो की नाही तोच त्याच्या याच साथीदारांनी त्याच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. तिघांनी त्यांच्याजवळील पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या मोहोळच्या मानेत लागल्या, एक छातीत तर एक गोळी शरद मोहोळच्या डोक्यात लागली. काही समजायच्या आत पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात दहशत असलेला शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
असा होता आरोपींचा एक्सझिट प्लॅन
शरद मोहोळला गोळ्या झाडणारे तीन मारेकरी नामदेव कानगुडे या त्यांच्या आणखी एका साथीदारासह सुतारदरा भागातून पळून गेले. त्यांचे आणखी चार साथीदार त्यांच्यासाठी दोन चारचाकी गाड्या घेऊन हजर होते. पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून या आठ जणांनी सातारच्या दिशेने वाहनातून जायचं ठरवलं होतं. मात्र, त्यांच्या गाड्यांचे नंबर ट्रेस करुन पुणे पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. शिरवळच्या जवळ पाठलाग करून आठ जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून तीन पिस्तुले देखील जप्त करण्यात आली आहेत.
दरम्यान शरद मोहोळचे हे मारेकरी त्याचे साथीदार म्हणून गेल्या काही दिवसांपासून त्याच्या टोळीत काम करत होते. यामधील साहील पोळेकर हा तर हत्येच्या आधी शरद मोहोळच्या घरी त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात देखील सहभागी झाला होता. वरवर शरद मोहोळचे साथीदार असल्याचे दाखवणारे हे मारेकरी शरद मोहोळवर नाराज होते. गांडले याच्यासोबत मोहोळची मुळशीमधील जुनी भांडणे होती तर पोळेकर याच्यासोबत देखील जमीन खरेदी विक्रीच्या देवाणघेवाणीतून वाद झाले होते. त्यातून त्यांनी शरद मोहोळच्या हत्येची योजना आखली गेली आणि अतिशय थंड डोक्याने ती अंमलातसुद्धा आणली.