पुणे: पुणे शहरातील कोथरूड भागात ५ जानेवारी रोजी कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या झाली होती. गँगवारमधून झालेल्या या हत्या प्रकरणानंतर पुणे शहर हादरले होते. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आठ आरोपींना १२ तासांत अटक केली होती. त्यानंतर तपासादरम्यान १७ आरोपींना अटक करण्यात आली. त्यामध्ये दोन वकिलांचा देखील समावेश आहे. या खून प्रकरणात सुरुवातीला साहील उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे हे मास्टर माइंड असल्याचे बोलले जात होते. परंतु, तपासात कुख्यात गुंड गणेश मारणे हा मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस त्याच्या शोधात होते. गणेश मारणे याला अटक करण्यासाठी गेल्या २५ दिवसांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर सिनस्टाईल पाठलाग करत गणेश मारणे याला नाशिकरोडमधून अटक करण्यात आली. मारणेसह त्याच्या इतर तीन साथीदारांना बेड्या ठोकण्यात आल्या.
कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात गणेश मारणे गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. सुरुवातीला गणेश मारणे तुळजापूर येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पुणे पोलिस तुळजापुरात दाखल झाले. परंतु, मारणे पुढे कर्नाटक गेला. यामुळे पुणे गुन्हे शाखेचे दुसरे पथक कर्नाटकमध्ये पोहचले. मात्र, पुन्हा एकदा गणेश मारणे पोलिसांना चकवा देत कर्नाटकमधून केरळमध्ये पसार झाला. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तो ओडिशा राज्यात गेला. ओडिशामधून पुन्हा नाशिकमध्ये आला. गणेश मारणे नाशिकमध्ये असल्याची टीप पुणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पुणे पोलिसांनी सापळा रचला.
पुणे पोलीस गणेश मारणे याच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन होते. तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याचा ठावठिकाणा शोधत होते. काही कलावधीतच त्याचे लोकेशन ट्रेस झाले आणि पोलिसांनी नाशिक येथून त्याचा पाठलाग सुरू केला. रस्त्यात तीन ट्रॅव्हल्स बसची तपासणी देखील करण्यात आली. अखेर मारणेसह त्याच्या साथीदारांना मोटारीतून जात असताना पकडले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली.