पुणे : सध्याच्या शिक्षण पद्धतीत आपण मागणीपेक्षा पुरवठा जास्त करत आहोत. त्यामुळेच बाजारात बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसते. परंतु आता नवीन शिक्षणपद्धती स्विकारून संशोधन, नवकल्पनांची जोड असणाऱ्या उद्योजकतेचे शिक्षण विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव मिळेलच, सोबतच त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळून बेरोजगारीचा प्रश्नही सुटेल व देशाच्या प्रगतीला हातभार लागेल, असे मत एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरु तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केले.
एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग (पुणे) यांच्यातर्फे विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ७५ हून अधिक नामवंत कंपन्यांसोबत सामंजस्य करार (MOU) करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी कंपन्यांच्या प्रतिनिधींसह प्रा. डॉ. सुनीता कराड, प्र. कुलगुरू डॉ. मोहित दुबे, डॉ. विरेंद्र शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. कराड पुढे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात (एनईपी) विद्यार्थ्यांमधील संशोधन व उद्योजकतेवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. ‘एनईपी’ची देशभरात घोषणा होण्यापूर्वीच एमआयटी एडीटी विद्यापीठाने संशोधन व उद्योजकतेवर भर देणाऱ्या अभ्यासक्रमांची अंमलबजावणी केलेली आहे. क्रेया व विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील संशोधन गुणांना प्रोत्साहन देण्याचे काम विद्यापीठामार्फत करण्यात येते. विद्यापीठाने यापूर्वीच टाटा मोटर्स, अॅपल यासारख्या कंपन्यांसोबत करार केलेले आहेत. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून आज ७५ हून अधिक कंपन्यांशी सामंजस्य करार करत आहोत. ज्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
या वेळी, प्रा. डॉ. सुनीता कराड यांनीही मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, सध्या देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना सोबतच सुशिक्षित बरोजगारांच्या संख्येतही भरमसाठ वाढ होत आहे. त्यामुळे, पारंपरिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठीत शिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. त्याचाच एक प्रयत्न म्हणून आम्ही देशभरातील नामवंत कंपन्यांना सामंजस्यासाठी साद घातली, ज्याला ७५ हून अधिक कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे, विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. एमआयटी एडीटीने यापूर्वीही अनेक उद्योजक घडविले असून, आज केलेल्या करारामुळे त्यामध्ये निश्चितच मोठी भर पडेल.
दीपप्रज्वलन व विश्वशांती प्रार्थनेने सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शेटे यांनी केले. तर आभार डॉ. सुधाकर सानप यांनी मानले.