पिरंगुट : पुण्यातील मुळशी तालुक्यातील हिट अँड रन प्रकरणातील गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान नऊ दिवसांनंतर मृत्यू झाला आहे. प्रेम साहेबराव चव्हाण (वय-१४) असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा गमावल्याने मुळशी तालुक्यातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमक काय घडलं?
मुलाशी तालुक्यातील शेरे येथील मामासाहेब मोहोळ विद्यालयामध्ये शिकत असलेला प्रेम चव्हाण (इयत्ता ७वी), कार्तिक रामेश्वर मावकर (वय१४, इयत्ता ८वी) आणि सम्यक प्रमोद चव्हाण (वय-१४, इयत्ता ८वी, सर्व रा. अकोले, ता. मुळशी) हे विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर घरी येत होते. त्यावेळी भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर कारचालक तसाच सुसाट निघून गेला.
दरम्यान, या अपघातात प्रेम हा गंभीर जखमी झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. कारचालक रूपेश पांडे याला या प्रकरणी पोलिसांनी अटकही केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुधीर घुले करत आहेत.
प्रेम’च्या उपचारासाठी नागरिकांनी घेतला पुढाकार
प्रेम चव्हाण हा आपल्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. प्रेमला अजून एक लहान बहीण आहे. तसेच त्याचे वडील हे गाडीचालक असल्याने त्याच्या घरची परिस्थिती ही हलाखीची आहे. त्यामुळे प्रेम चव्हाण या चिमुकल्याचे प्राण वाचविण्यासाठी हॉस्पिटलच्या खर्चासाठी गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन लाखो रुपयांची देणगीदेखील गोळा केली होती. मात्र, त्याचे प्राण न वाचल्याने हळहळ व्यक्त हाेत आहे. स्वभावाने प्रेमळ आणि मनमिळावू प्रेमाच्या निधनाची बातमी कळताच गावावर शोककळा पसरली आहे.