पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयाचे डॉक्टरच रुग्णांना निर्जन स्थळी सोडत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड आणि रितेश गायकवाड यांनी सापळा रचून हा प्रकार उजेडात आणला होता. यानंतर संबंधित डॉक्टरवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच आरोपी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तरीही ससून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आदी कुमार असं निलंबित करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
या प्रकारानंतर ससूनचे डीन म्हणाले, याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधित लोकांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आदी कुमार या डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. याबाबत आणखी कोणी सहभागी आहे का याबाबत तपास सुरु आहे आहे. रुग्ण आधार फाउंडेशनच्या माध्यमातून फुटपाथवर जगणाऱ्या तसेच बेवारस रुग्णांना आश्रमात आश्रय देण्याचे काम करणाऱ्या रितेश गायकवाड यांनी ससूनचे हे गंभीर प्रकरण उजेडात आणले होते.
म्हणून आम्ही बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडतो
रितेश गायकवाड म्हणाले, काल मी ससूनबाहेर उभा असताना आदी नावाचा एक डॉक्टर त्या ठिकाणी आला. एका रुग्णाला सोडायचे आहे असं आम्हाला म्हणाला. पुढे त्याने सांगितले की, बेवारस रुग्णांना सांभाळायला, त्यांच्यावरील उपचाराची कार्यवाही करायला त्रास होतो. म्हणून आम्ही बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडत असतो. यासाठी आम्ही एक रिक्षावाला ठरवला असून, त्याला 500 ते 600 रुपये देतो, असं गायकवाड यांनी सांगितले.