पिंपरी: वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमध्ये इंद्रायणी नदी पुन्हा एकदा जलप्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अशातच इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे. या नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे हे प्रदूषण होत असल्याचा आरोप आळंदीकर करत आहे. मागील काही दिवसांमध्ये इंद्रायणी नदीमध्ये वारंवार रसयानुक्त फेस येत असल्याचं समोर येत आहेत. याबाबत प्रशासन देखील गंभीर नसल्याचे चित्र आहे.
नऊ डिसेंबरला आळंदीमध्ये कार्तिकी वारी सोहळा होणार आहे. तर अकरा डिसेंबरला ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल होत असतात. या वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. इंद्रायणीच्या प्रदूषणामुळे वारकरी आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर प्रशासन देखील ठोस पावलं उचलत नसल्याचे पाहायला मिळत आहे. इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त व्हावी, यासाठी प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलणे गरजेचे आहे.