भोर : राज्यात भात उत्पन्नात प्रसिद्ध, भाताचे आगार समजले जाणाऱ्या भोर तालुक्यातील इंद्रायणी भाताची कापणी उरकली आहे. ‘इंद्रायणी’चा सुगंध तालुक्यात सर्वत्र दरवळू लागला आहे. सध्या शेतकरी भात कांडप करून घेत आहेत. खरीप हंगाम संपल्याने शेतकरी वर्षभराचे प्रमुख पीक असलेले भात कांडप करण्याच्या कामात व्यस्त झाला आहे. गावोगावी असणाऱ्या कांडप केंद्रांवर भात कांडप सुरू झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राईस मिल मालकांकडून शेतकऱ्यांना भात वाहतूक मोफत करून, पुन्हा घरपोच तांदूळ केला जात आहे. यावर्षी तालुक्यात भाताच्या इंद्रायणी वाणाच्या उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत घट झाली आहे.
नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला भोर तालुका आहे. पावसाने खरिपातील पिकांना यंदा चांगली साथ दिली. मात्र, शेवटच्या टप्प्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने, तसेच भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात कमालीची घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यंदा इंद्रायणी तांदळाचा बाजारभाव ५५ ते ६० रुपये प्रति किलो होईल, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तालुक्यात सुमारे ७ हजार ४०० हेक्टरवर भाताची लागवड केली गेली होती. प्रामुख्याने इंद्रायणी, रत्नागिरी २४, कोळंबा, आंबेमोहोर, बासमती, गंगा कावेरी, कर्जत १८४ अशा अनेक जातींची लागवड झाली होती.