पुणे : पुणे आणि परिसरात किरकोळ कारणावरून बेदम मारहाणीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. केवळ रागाने पाहिल्याच्या कारणावरुन तिघांनी एका तरुणाला दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी (ता. १५) रात्री आठच्या सुमारास उरुळी देवाची परिसरात घडली. या प्रकरणी तिघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ज्योतीरादित्य विक्रम भालेराव (वय १९, रा. सावली होम्स, उरुळी देवाची ता. हवेली) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तेजस थोरात, सत्या पांढर व एका अनोळखी व्यक्तीवर (सर्व रा. उरुळी देवाची) गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी ज्योतीरादित्य भालेराव आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास फिर्य़ादी आणि त्याचा मित्र अभिषेक विरेंद्र पांडे हे धनगरवस्ती मधील पडक्या तळ्याच्या रस्त्याच्या बाजूला गप्पा मारत उभा होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरुन त्याठिकाणी आले. त्यांनी भालेराव याला ‘तुला माज आला आहे का’, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यावेळी भालेराव याने आरोपींकडे रागाने पाहिले. या कारणावरुन आरोपींनी फिर्यादी व त्याचा मित्र अभिषेक यांच्यासोबत वाद घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच रस्त्याच्या कडेला पडलेल्या दगडाने ज्योतीरादित्य याला मारुन जखमी केले.