पुणे : सरहद, पुणे आयोजित ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत होत आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये होणाऱ्या या संमेलनासाठी पुणे ते दिल्ली विशेष रेल्वे मिळावी, यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही यासाठी विशेष प्रयत्न केले. मात्र, पुणे ते दिल्ली सवलतीच्या दरात विशेष रेल्वे देण्यास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कार्यालयाने नकार दिल्याचे संयोजकांना कळविण्यात आले. त्यामुळे साहित्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे संमेलन दिमाखात व्हावे, असे संयोजकांकडून प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी २०१५ तसेच १९५४ सालीही केंद्र सरकारने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सवलतीच्या दरात रेल्वे उपलब्ध करून दिली होती. २०१५ साली तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दोन रेल्वे यासाठी मंजूर केल्या होत्या. म्हणूनच ७० वर्षांनंतर दिल्लीत होणाऱ्या संमेलनासाठी केंद्र सरकारने रेल्वे मंजूर करण्यासाठी सरहद संस्थेकडून प्रयत्न सुरू होते.
मात्र, रेल्वेमंत्र्यांनी नकार दिल्याने संयोजकांसह साहित्यप्रेमींची निराशा झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दिल्लीतील मंत्र्यांनी यासाठी प्रयत्न करून हा देशाच्या राजधानीत होणारा मराठी भाषेचा उत्सव दिमाखदार होण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन सरहद संस्थेच्या वतीने संजय नहार यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.